फुलसावंगी परिसरात अवैध गॅस विक्रीचा सुळसुळाट; कारवाई फक्त दिखावा? उपमथळा:

घरगुती सिलेंडर 300 रुपयांनी ‘ऑन’ विक्री; हॉटेल-धाब्यांत उघडपणे वापर, पुरवठा विभाग मौन
महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील फुलसावंगी, काळी दौलत खान, पोखरी, गुंज, सवना व मुडाणा परिसरात घरगुती गॅस सिलेंडरचा मोठ्या प्रमाणावर अवैध वापर आणि विक्री सुरू असल्याचे उघडपणे दिसत असतानाही संबंधित पुरवठा विभागाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घरगुती गॅस सिलेंडरवर सुमारे 300 रुपयांनी ‘ऑन’ घेऊन सर्रास विक्री केली जात आहे. विशेष म्हणजे, हॉटेल, धाबे तसेच चहा कॅन्टीनवरही घरगुती गॅसचा बेकायदेशीर वापर मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. व्यावसायिक वापरासाठी वेगळ्या दराचे सिलेंडर उपलब्ध असताना नियमबाह्य पद्धतीने घरगुती सिलेंडरचा वापर केला जात असल्याने शासनाचा महसूल बुडत आहे.
दैनिक महासागर व उंबरखेड वार्ता ची दखल घेऊन आज 18 -3- 2026 रोजी तहसील प्रशासनाने 13 गॅस सिलेंडर जप्त करून कारवाई केल्याचे दाखवले असले, तरी प्रत्यक्षात अवैध गॅस विक्री करणाऱ्या मुख्य व्यक्तींवर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने ही मोहीम केवळ ‘दाखवण्यासाठी’ असल्याची चर्चा महागाव नगरीत रंगली आहे.
स्थानिकांच्या मते, अवैध गॅस विक्रेते आणि त्यांचे ठिकाणे प्रशासनाला माहीत असूनही कारवाई टाळली जात आहे. त्यामुळे संबंधित विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नागरिकांनी यावर तातडीने व्यापक मोहीम राबवून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्यथा भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.



