विषारी ‘स्पेंट वॉश’ थेट शेतात; जनावरांना मृत्यूचा धोका, शेतकऱ्यांचा संताप उपमथळा: (भाग 2)

इंधन बचतीसाठी टँकर चालकांची चलाखी; पर्यावरणाला गंभीर धोका
महागाव प्रतिनिधी | संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील सवना ते गुंज परिसरात मोठा पर्यावरणीय प्रकार उघडकीस आला असून, डेफ्कन डिस्टिलरी प्रकल्पातून निघणारा विषारी ‘स्पेंट वॉश’ थेट शेतशिवारात सोडला जात असल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जालना–औरंगाबाद येथील ट्रान्सपोर्ट कंपनीकडून कंत्राटावर चालणारे टँकर हे रासायनिक पाणी नियमानुसार प्रक्रिया केंद्रात न नेता, इंधनाची बचत करण्यासाठी शॉर्टकट मार्गाने कान्हा सारखीनी फाटा, शिरपूर परिसरातील शेतातच सोडत आहेत. हा प्रकार उघडकीस आल्याने प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
या ‘स्पेंट वॉश’मुळे परिसरातील पाण्याचा रंग काळवंडला असून तीव्र दुर्गंधी पसरली आहे. शेतातील पिके नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला असून, जनावरांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होत आहे. यापूर्वीही शिरपूर शिवारात विषारी पाणी पिल्याने जनावरांचे मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या प्रकाराबाबत अनेकदा तक्रारी करूनही प्रशासन व प्रदूषण नियंत्रण यंत्रणेकडून ठोस कारवाई होत नाही. काही ठिकाणी स्पेंट वॉश साठवण्यासाठी व्यवस्था असतानाही टँकर चालकांकडून नियमबाह्य पद्धतीने ते थेट शेतात टाकले जात असल्याचा आरोप आहे.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते अनंत नागरगोजे यांनी जिल्हा प्रशासनाकडे लिखित तक्रार दाखल केली असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, संबंधित कंपनीवर दंडात्मक कारवाई करावी तसेच कारखान्याचे परवाने रद्द करावेत, अशी मागणी केली आहे.
पर्यावरण आणि जलस्रोतांचे रक्षण करण्यासाठी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करणे गरजेचे असल्याचे नागरिकांनी स्पष्ट केले आहे.



