शहर

महागाव नगरपंचायत प्रकरण : “विधानसभेचे सदस्य नितीन भुतडा कोण?” पत्रामुळे नवा वाद


महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव नगरपंचायतीतील कथित गैरव्यवहाराच्या चौकशी संदर्भातील एका शासकीय पत्रामुळे सध्या तालुक्यात चर्चेचे वातावरण निर्माण झाले आहे. नगररचना विभागाच्या कार्यक्षम अधिकारी शिल्पा कवळे यांनी 24 सप्टेंबर 2025 रोजी जिल्हाधिकारी यवतमाळ यांना पत्र पाठवून महागाव नगरपंचायतीतील काही मुद्द्यांवर चौकशी करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल शासनाला सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
या पत्रात नमूद केल्याप्रमाणे, 25 ऑगस्ट 2023 पासून नगराध्यक्षांच्या कार्यकाळात झालेल्या कथित गैरव्यवहाराबाबत विषय समिती स्थापन करून कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात 9 सप्टेंबर 2025 रोजी मुख्यमंत्री यांना पाठवलेल्या पत्राची प्रत जोडण्यात आली असून त्या पत्रावर आमदार किसन वानखेडे तसेच “विधानसभेचे सदस्य नितीन भुतडा” असा उल्लेख करण्यात आला आहे.
मात्र या पत्रातील “विधानसभेचे सदस्य नितीन भुतडा” हा उल्लेखच सध्या महागाव नगरपंचायत परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. नितीन भुतडा हे नेमके कोणत्या मतदारसंघाचे विधानसभा सदस्य आहेत, असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे.
शासकीय पत्रात असा उल्लेख कसा झाला? संबंधित अधिकाऱ्यांनी त्याची पडताळणी केली होती का? तसेच अशा संदिग्ध पत्राच्या आधारे चौकशी प्रक्रिया सुरू करणे कितपत योग्य आहे, असे प्रश्नही नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.
दरम्यान, या पत्राची प्रत आमच्या प्रतिनिधीच्या हाती लागल्याने ही बाब समोर आली असून, या प्रकरणात प्रशासनाने स्पष्टीकरण द्यावे अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे.
महागाव नगरपंचायतमधील कथित गैरव्यवहाराच्या चौकशीसोबतच पत्रातील या उल्लेखामुळे प्रशासनाच्या कामकाजावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, अशी चर्चा तालुक्यात रंगली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button