विदर्भातील अग्रेसर वसंत कारखान्याची गाळप व्यवस्था कोलमडली; शेतकऱ्यांवर आर्थिक संकट

सहसंपादक शेख मुजाहिद
उमरखेड : विदर्भात अग्रेसर मानला जाणारा वसंत सहकारी साखर कारखाना, पोफाळी सध्या गंभीर व्यवस्थापकीय गोंधळात सापडला असून गाळप हंगामात प्रचंड ताणतणाव निर्माण झाला आहे. भैरवनाथ शुगर युनिटला १५ वर्षांच्या भाडेतत्त्वावर कारखाना दिल्यानंतरही योग्य नियोजनाचा अभाव, अपुरी यंत्रणा आणि अनुभवहीन व्यवस्थापनामुळे कारखान्याची कार्यक्षमता पूर्णतः ढासळल्याचे चित्र आहे.
वसंत कारखान्याचे कार्यक्षेत्र पाच तालुक्यांमध्ये पसरलेले असून, या भागात ऊसाचे क्षेत्रफळ सर्वाधिक आहे. मात्र कारखाना उशिरा सुरू झाल्याने आणि गाळप सुरळीत न झाल्याने इतर कारखान्यांनी चांगला ऊस आपल्याकडे वळविला. परिणामी वसंत कारखान्याकडे ऊस असूनही गाळप होत नसल्याची विरोधाभासी परिस्थिती निर्माण झाली आहे.
कारखाना कधी यंत्रणा बिघाडामुळे तर कधी ऊस नसल्याचे कारण देत वारंवार बंद पडत आहे. याचा थेट फटका ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसत असून ऊस वेळेवर गाळपासाठी न गेल्याने वजन घटते आणि आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. ऊसतोड कामगारांच्या टोळ्या शेतकऱ्यांकडून आगाऊ पैशांची मागणी करत असल्याने शेतकरी अधिकच अडचणीत सापडला आहे.
इतर कारखाने ऊसाला जादा दर देत असताना वसंत कारखान्याचा दर तुलनेने कमी आहे. तरीही शेतकरी नाईलाजाने ऊस वसंत कारखान्याला देत आहेत. मात्र कारखाना पूर्ण क्षमतेने चालत नसल्याने गाळपात सतत अडथळे येत आहेत. दुसरीकडे इतर कारखान्यांचे गाळप सुरळीत सुरू असल्याने वसंतच्या कार्यक्षेत्रातून ऊस ‘पळविला’ जात असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.
वसंत कारखान्याकडे अनुभवी तांत्रिक यंत्रणा नसल्याने रोज नवनव्या अडचणी निर्माण होत असून व्यवस्थापनाचे अपयश उघडपणे समोर येत आहे. वसंतच्या कार्यक्षेत्रात इतर कारखान्यांच्या ऊसतोड टोळ्या तळ ठोकून बसल्याने शेतकऱ्यांचा ऊस मोठ्या प्रमाणात बाहेर जात आहे.
एकेकाळी विदर्भातील आदर्श कारखाना म्हणून ओळख असलेल्या वसंत कारखान्याची ही अवस्था पाहता, शेतकरी संतप्त झाले असून कारखान्याच्या व्यवस्थापनाने तातडीने ठोस पावले उचलून गाळप सुरळीत करावे, अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा ऊस उत्पादकांकडून दिला जात आहे.



