रमेश चव्हाण हल्ला प्रकरण व शिवरायांच्या पुतळ्यालगतचे अतिक्रमण; २ जुलैला उमरखेड बंदचा इशारा, पोलीस महासंचालकांकडे शिवसेनेचे निवेदन

उमरखेड, दि. ३० जून :
शिवसेना शिंदे गट उमरखेड शहरप्रमुख ॲड. संजीवकुमार जाधव यांनी अमरावती परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे निवेदन सादर करून, शिवसेनेचे सक्रिय कार्यकर्ते रमेश चव्हाण यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यातील आरोपींना तात्काळ अटक करावी, तसेच श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यालगतचे अतिक्रमण तातडीने हटवावे, अशी जोरदार मागणी केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, रमेश चव्हाण यांच्यावर झालेल्या गंभीर हल्ल्यानंतरही मुख्य आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून, कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणाचा निष्पक्ष आणि वेगवान तपास करून दोषींना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यालगतचे कथित अतिक्रमण अनेक निवेदने व आंदोलने करूनही अद्याप हटविण्यात आलेले नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या जात असून प्रशासनाकडून होत असलेल्या दिरंगाईविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
या दोन्ही गंभीर प्रश्नांकडे शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी दि. २ जुलै २०२६ रोजी उमरखेड शहर बंद पाळण्यात येणार असल्याची माहितीही निवेदनाद्वारे देण्यात आली आहे.
शहर बंद शांततेत आणि लोकशाही मार्गाने पार पडणार असला, तरी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आवश्यक पोलीस बंदोबस्त ठेवावा, तसेच संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कारवाईचे निर्देश द्यावेत, अशी मागणी पोलीस महानिरीक्षकांकडे करण्यात आली आहे.
शिवसेनेने स्पष्ट इशारा दिला आहे की, रमेश चव्हाण हल्ला प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई आणि शिवरायांच्या पुतळ्यालगतचे अतिक्रमण हटविण्याबाबत प्रशासनाने तातडीने निर्णय घेतला नाही, तर जनतेच्या सहभागातून लोकशाही मार्गाने आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल.



