वरिष्ठ पत्रकार एस. ए. मन्नान यांची हिमायतनगर तालुका अल्पसंख्याक काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती

हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी शेख खय्यूम): महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने हिमायतनगर तालुका अल्पसंख्याक काँग्रेस अध्यक्षपदी वरिष्ठ पत्रकार एस. ए. मन्नान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाचे माजी आमदार माधवराव पाटील जळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती जाहीर करण्यात आल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
एस. ए. मन्नान हे गेल्या ४० वर्षांपासून हिमायतनगरमध्ये काँग्रेस पक्ष तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे काम अत्यंत निष्ठेने करत आहेत. त्यांचे वडील कै. सय्यद अब्दुल्ला यांनी सन १९७९ मध्ये या भागात काँग्रेस पक्षाची नवीन स्थापना करण्यात मोलाचे योगदान दिले होते. हाच वारसा पुढे चालवत मन्नान यांनी पक्षात आपले स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार माधवराव पाटील जळगावकर तसेच हिमायतनगर तालुका काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यांच्या माध्यमातून अल्पसंख्याक समाजाचे प्रश्न प्रभावीपणे मांडले जातील आणि काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक बळकट होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी वरिष्ठ पत्रकार एस. ए. मन्नान यांचे अभिनंदन करून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी निष्ठेने कार्य करण्याच्या शुभेच्छा दिल्या.
नवनियुक्त तालुका अल्पसंख्याक काँग्रेस अध्यक्ष एस. ए. मन्नान यांनी पक्षश्रेष्ठींनी आपल्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल आभार मानत, पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच अल्पसंख्याक समाजासह सर्व घटकांच्या हितासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.



