मसूद खान यांची शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुख पदी निवड; हिमायतनगर चौपाटीवर कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतिषबाजी

हिमायतनगर तालुका (प्रतिनिधी शेख खय्यूम): शिवसेना पक्षातील सक्रिय नेते मसूद खान यांची शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुख पदी अधिकृत निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे हिमायतनगर तालुक्यासह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या निवडीचे वृत्त समजताच अन्सार शेवालकर यांनी मसूद खान यांना आपल्या ऑफिसवर बोलावून, त्यांची गळाभेट घेत त्यांचे मनापासून अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी सैयद नयुम बाबा खान, महेबूब खान, महेमूद खान, रहीम खान यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना नवनियुक्त उपजिल्हाप्रमुख मसूद खान यांनी पक्षश्रेष्ठींचे आभार मानले. तसेच “भविष्यात कोणत्याही गरीब नागरिकाचे काहीही काम असल्यास, आमच्याकडून शक्य ती सर्व मदत आम्ही नक्कीच करू,” अशी ग्वाही त्यांनी दिली.
निवडीची घोषणा झाल्यानंतर मसूद खान यांचे हिमायतनगर शहरात आगमन होताच कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. उत्साही कार्यकर्त्यांनी शहरातील मुख्य चौपाटी परिसरात एकत्र येत जोरदार फटाक्यांची आतिषबाजी केली आणि घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला. मसूद खान यांच्या पक्षकार्यातील सततचा सहभाग आणि जनसंपर्क लक्षात घेऊन पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर ही मोठी जिम्मेदारी सोपवली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वस्तरातून हार्दिक अभिनंदन केले जात आहे.



