आरक्षण उपवर्गीकरण विरोधी समितीची बैठक संपन्न; ८ जुलै रोजी उमरखेड येथे जनआक्रोश मोर्चाची घोषणा

उमरखेड ,आज दि. 24 जून 2026 रोजी (बुधवार) उमरखेड येथील गार्डन सभागृहात आरक्षण उपवर्गीकरण विरोधी समितीची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीस विविध आंबेडकरी सामाजिक संघटना, संघटनांचे पदाधिकारी व विविध पक्षांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत आरक्षण उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी एकमताने भूमिका मांडत सांगितले की, ही लढाई कोणत्याही समाजाच्या विरोधातील नसून भारतीय संविधानाच्या संरक्षणासाठीची आहे. संविधानिक हक्क, सामाजिक न्याय आणि आरक्षण व्यवस्थेचे संरक्षण करण्यासाठी सर्व समाजघटकांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
बैठकीत केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांवर टीका करत, समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आला. तसेच अनुसूचित जातींमधील रिक्त पदांचा अनुशेष भरावा, शासकीय सेवांमधील आरक्षणाची प्रभावी अंमलबजावणी करावी आणि खासगी क्षेत्रातही आरक्षण लागू करण्याबाबत सरकारने ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी आरक्षण उपवर्गीकरण रद्द करण्याच्या मागणीसाठी दि. 8 जुलै 2026 रोजी उमरखेड येथे भव्य जनआक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. या मोर्चामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय तसेच संविधानवादी विचारांच्या सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.
बैठकीला देवानंद पाईंकराव, सुधाकर लोमटे सर, नगरसेवक राहुल काळबांडे, नगरसेवक वीरेंद्र खंदारे, श्यामभाऊ धुळे, सिद्धार्थ दिवेकर, प्रफुल दिवेकर, सिधोधन दिवेकर, मनोजभाऊ धूळध्वज, अरविंददादा धोंगडे, धम्मदीप काळबांडे, प्रसेंजीत दिवेकर, विकास खिलारे, गोपालभाऊ मुनेश्वर, प्रसाद खंदारे, सिधोधन धोंगडे, अशोक गायकवाड, विजय हनवत्ते, कंथक दवणे, विनोद इंगोले, संदीप राऊत, बबलू भालेराव, सुमेध दवणे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकीचा समारोप संविधान रक्षण, सामाजिक एकता आणि लोकशाही मूल्यांच्या जतनाचा निर्धार व्यक्त करून करण्यात आला.



