महागावच्या सुशांत भरवाडेची भारतीय नौदलात निवड; तालुक्यात आनंदोत्सव

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव : महागाव तालुक्यातील सुशांत राजू भरवाडे याची भारतीय नौदलात (नेव्ही) फौजी म्हणून निवड झाल्याने संपूर्ण तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. महागाव तालुक्यातून नेव्हीमध्ये निवड होणाऱ्या मोजक्या युवकांपैकी सुशांतने मानाचा तुरा रोवला असून त्याच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सुशांतच्या या यशामागे त्याची अथक मेहनत, जिद्द आणि कठोर परिश्रम असून त्याला कुटुंबाचीही भक्कम साथ लाभली. विशेषतः वडील राजू भरवाडे यांचे आपल्या मुलाने देशसेवा करावी आणि सैन्यात भरती व्हावे, हे स्वप्न होते. त्यांनी अनेक अडचणींवर मात करत मुलाला प्रोत्साहन दिले. अखेर सुशांतने भारतीय नौदलात निवड मिळवून वडिलांचे स्वप्न साकार केले.
सुशांतच्या निवडीची बातमी समजताच महागाव नगरीत आनंदाची लाट उसळली असून त्याच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू झाली आहे. विविध सामाजिक, शैक्षणिक व युवक संघटनांकडून त्याचा सत्कार करण्याची तयारी करण्यात येत आहे.
देशसेवेची भावना आणि जिद्दीच्या जोरावर यश संपादन करणाऱ्या सुशांत भरवाडे याने तालुक्यातील युवकांसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला असून त्याच्या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



