शहर

२ वर्षांपासून शाळा व्यवस्थापन समिती धुळखात; हिमायतनगरच्या PM SHRI जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये अध्यक्षपदाच्या निवडीवरून राडा!

​
​२ वर्षे उलटली तरी समिती स्थापन नाही; पारदर्शकतेचा बोजवारा उडाल्याने पालकांचा संतप्त आक्रोश!
​हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी शेख खय्यूम):
हिमायतनगर शहरातील PM SHRI जिल्हा परिषद हायस्कूल येथे शाळा व्यवस्थापन व शिक्षण समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून शिक्षक आणि पालकांमध्ये जोरदार गदारोळ झाला. विशेष म्हणजे, गेल्या तब्बल दोन वर्षांपासून जुनी समिती बरखास्त झालेली असतानाही प्रशासनाला नवीन समिती स्थापन करता आली नाही. तब्बल दोन वर्षांच्या विलंबाने अचानक घेण्यात आलेल्या या निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकतेचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याने संतापलेल्या पालकांनी तीव्र आक्षेप नोंदवला, ज्यामुळे अखेर ही निवडणूक प्रक्रिया रद्द करण्याची वेळ शाळा प्रशासनावर आली.
​मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षण समितीच्या अध्यक्षपदाची निवड करताना पालकांना व नागरिकांना शासकीय नियमावलीची (जीआर) कोणतीही पूर्वकल्पना न देता, तसेच पारदर्शक वेळापत्रक जाहीर न करता प्रक्रिया घाईगडबडीत गुंडाळण्याचा प्रयत्न सुरू होता, असा थेट आरोप पालकांनी केला. यामुळे शाळा परिसरात काही काळ कमालीचा तणाव निर्माण झाला होता. दोन वर्षे उलटूनही शाळा व्यवस्थापन समिती का गठीत केली नाही, असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.
​या संपूर्ण प्रकरणावर शाळेचे मुख्याध्यापक भारती सर यांनी प्रशासनाची बाजू मांडताना सांगितले की,
​”२२ ऑगस्ट २०२६ रोजी आम्ही विद्यार्थ्यांमार्फत पालकांना नोटीस पाठवली होती. २७ ऑगस्ट रोजी झालेल्या पालक मेळाव्यात पालकांचे एकमत न झाल्यामुळे शाळा व्यवस्थापन समितीच्या निवडीला स्थगिती देण्यात आली आहे. पुढील तारीख पालकांना यथावकाश कळवली जाईल.”
​मात्र, दोन वर्षांचा प्रदीर्घ काळ लोटूनही शाळा व्यवस्थापन समिती नसणे आणि ऐन निवडणुकीच्या वेळी जीआर व नियमांची योग्य माहिती न दिल्याने पालकांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला. प्रशासनाच्या या मनमानी कारभारामुळे शाळेच्या व्यवस्थापनावर आणि पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून शहरात या विषयावरून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button