छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या सन्मानासाठी आमरण उपोषणास प्रारंभ; प्रशासनाच्या भूमिकेवर नागरिकांचा सवाल

सहसंपादक शेख मुजाहिद मो.नं.9021233696
उमरखेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या अनावरणाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असून स्मारक परिसरातील कथित अनधिकृत व नियमबाह्य पेट्रोल पंप हटवून स्मारकाचे तात्काळ अनावरण करण्यात यावे, या मागणीसाठी शिवप्रेमी तथा मराठा सेवा संघाच्या वतीने सौ. सरोजा नंदकुमार देशमुख यांनी दिनांक २५ जून २०२६ पासून आमरण उपोषणास सुरुवात केली आहे.
आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, स्मारकाच्या सन्मानासाठी अनेक वेळा निवेदने, आंदोलने, पाठपुरावा व प्रशासनाशी चर्चा करण्यात आली. मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने अखेर लोकशाही मार्गाने आमरण उपोषणाचा निर्णय घेण्यात आला आहे.
उपोषणाच्या पहिल्याच दिवशी शिवप्रेमी, मराठा सेवा संघाचे कार्यकर्ते, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. प्रशासनाच्या भूमिकेबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, कथित अतिक्रमणाबाबत वारंवार तक्रारी होऊनही संबंधित पेट्रोल पंपावर कार्यवाही का होत नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
नागरिकांमध्ये अशी चर्चा आहे की, जर संबंधित पेट्रोल पंप नियमबाह्य अथवा अतिक्रमणामध्ये असल्याचे वारंवार सांगितले जात असेल, तर त्याबाबत प्रशासनाने आजपर्यंत स्पष्ट भूमिका का घेतली नाही? संबंधित प्रकरणात नेमकी अडचण काय आहे? कार्यवाहीस विलंब का होत आहे? याबाबत प्रशासनाने जनतेसमोर स्पष्टीकरण देणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.
आंदोलनकर्त्यांनी असा आरोप केला आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासारख्या अस्मितेच्या विषयावर प्रशासन अपेक्षित गांभीर्य दाखवत नाही. त्यामुळे प्रशासनावर राजकीय दबाव आहे का, अथवा इतर कोणत्या कारणामुळे कार्यवाही रखडली आहे, असा संशय नागरिक व्यक्त करीत आहेत. या सर्व बाबींवर प्रशासनाने पारदर्शकपणे भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
“छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे प्रतीक आहेत. त्यांच्या स्मारकाच्या अनावरणासाठी शिवप्रेमींना आमरण उपोषण करावे लागत असेल तर ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. स्मारकावरील सर्व अडथळे दूर करून तात्काळ सन्मानाने अनावरण करण्यात यावे,” अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली.
जोपर्यंत स्मारकाच्या अनावरणाबाबत ठोस निर्णय होत नाही आणि कथित अतिक्रमणाबाबत स्पष्ट कार्यवाही होत नाही, तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहणार असल्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. त्यामुळे आता प्रशासन या आंदोलनाची कितपत दखल घेते, याकडे संपूर्ण उमरखेड तालुक्याचे लक्ष लागले आहे.



