Uncategorized

नाईकनगर-सुधाकरनगर पाणीटंचाई : नागरिक संतप्त, गटविकास अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी


महागाव | प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील नाईकनगर व सुधाकरनगर येथे गेल्या वीस दिवसांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून नागरिकांना पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.
स्थानिक नागरिकांनी गटविकास अधिकारी, महागाव यांची भेट घेऊन तातडीने पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्याची मागणी केली होती. तसेच सोमवारीच पाण्याची व्यवस्था करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. मात्र आजपर्यंत प्रत्यक्षात कोणतीही व्यवस्था करण्यात आली नसल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.
या प्रकारामुळे नागरिकांनी गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत त्यांच्या विरोधात कारवाईची मागणी केली आहे. पाणीटंचाईसारख्या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करणाऱ्या ग्रामसेवक व अधिकाऱ्याला तातडीने निलंबित करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी संबंधित मंत्री व वरिष्ठ प्रशासनाकडे केली असल्याची माहिती समोर येत आहे.
उन्हाळ्याच्या व पावसाळ्याच्या उंबरठ्यावरही नागरिकांना मूलभूत गरज असलेल्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता या प्रकरणात वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधी काय भूमिका घेतात आणि नागरिकांच्या पाणीप्रश्नावर किती लवकर तोडगा काढला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
“वीस दिवसांपासून पाण्याचा थेंब नाही; आश्वासनांचीच बरसात, पण नळ मात्र कोरडेच”, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button