Uncategorized

महागावातील वाढत्या गुन्हेगारीची चौकशी करा; दोषींवर कारवाईची मागणी विशाल डहाळे


महागाव प्रतिनिधी
महागाव तालुक्यात मागील दोन वर्षे सहा महिन्यांच्या कालावधीत वाढलेल्या गुन्हेगारी, अवैध धंदे व संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष विशाल डहाळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, तालुक्यात चोरी, दरोडे, जनावरांची तस्करी, गांजा तस्करी, जुगार, मटका तसेच इतर विविध अवैध धंद्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये भीती व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तसेच तत्कालीन अधिकारी धनराज निळे यांच्या कार्यकाळात अनेक अवैध धंदे सुरू असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्याने होत होत्या. मात्र संबंधित प्रकारांवर प्रभावी कारवाई झालेली दिसून आली नसल्याने कर्तव्यात अपेक्षित दक्षता दाखविण्यात आली का, याबाबत नागरिकांमध्ये संशय व्यक्त केला जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, अलीकडेच महागाव येथे बदली होऊन आलेले पोलीस निरीक्षक आंबोरे यांनी विविध ठिकाणी धाडी टाकून अनेक अवैध धंद्यांवर कारवाई केल्याने यापूर्वी दडपून ठेवण्यात आलेल्या अनेक बाबी उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे पूर्वीच्या काळात संबंधित अवैध व्यवसायांकडे दुर्लक्ष झाले का अथवा काही अधिकाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केली का, याची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यासोबतच मागील अडीच वर्षांतील गुन्हेगारी व अवैध धंद्यांची चौकशी, संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करणे, हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर विभागीय कारवाई करणे, अवैध धंद्यांच्या उच्चाटनासाठी विशेष मोहीम राबविणे आणि चौकशी अहवाल सार्वजनिक करणे अशा मागण्या देखील निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.
या गंभीर विषयाकडे जिल्हा पोलीस प्रशासनाने लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा विशाल डहाळे यांनी व्यक्त केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button