Uncategorized

दोन वर्षांपासून सुरू असलेल्या हातभट्ट्यांवर एलसीबीचा धडाका; फुलसावंगी शिवारातील दोन दारू अड्डे उद्ध्वस्त ३ हजार ६०० लिटर मोहसडवा नष्ट; १ लाख ३७ हजारांचा मुद्देमाल जप्त


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील फुलसावंगी शिवारात पैनगंगा नदीकाठावर गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या अवैध हातभट्टी दारू व्यवसायावर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत दोन दारू अड्डे उद्ध्वस्त केले. या कारवाईत ३ हजार ६०० लिटर मोहसडवा आणि ११० लिटर तयार गावठी दारू जप्त करून नष्ट करण्यात आली. एकूण १ लाख ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, फुलसावंगी परिसरातील पैनगंगा नदीच्या पात्रालगत अवैधरित्या हातभट्टी दारू तयार केली जात असल्याची माहिती प्राप्त झाली होती. विशेष म्हणजे हा अवैध व्यवसाय मागील दोन वर्षांपासून सुरू असल्याची माहितीही पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पुसद-उमरखेड एलसीबी पथकाने पंचांसमक्ष दोन ठिकाणी छापेमारी केली.
छापेमारीदरम्यान १ लाख २६ हजार रुपये किमतीचा ३ हजार ६०० लिटर मोहसडवा तसेच ११ हजार रुपये किमतीची ११० लिटर तयार गावठी दारू आढळून आली. पोलिसांनी आवश्यक नमुने जप्त करून उर्वरित मोहसडवा व तयार दारू घटनास्थळीच पंचनामा करून नष्ट केली.
या प्रकरणी गणेश किशन बोरकर (वय २५, रा. फुलसावंगी) व नूर खान असलम खान (वय ५०, रा. फुलसावंगी) यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) व (फ) अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, दोन वर्षांपासून सुरू असलेल्या या अवैध व्यवसायावर आतापर्यंत कारवाई का झाली नाही, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. पैनगंगा नदीकाठावर इतक्या मोठ्या प्रमाणात हातभट्टी सुरू असताना संबंधित यंत्रणांच्या निदर्शनास हा प्रकार कसा आला नाही, याबाबतही चर्चा सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुसद-उमरखेड एलसीबी पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
अवैध दारू निर्मिती व विक्रीविरोधातील ही मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला असून अशा बेकायदेशीर व्यवसायांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button