हिमायतनगर तालुका नशामुक्त करण्यासाठी पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे ॲक्शन मोडमध्ये; पत्रकारांशी संवाद साधत जाहीर केली धडक मोहीम

हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी शेख खय्यूम):
तालुक्यातील अवैध धंदे, वाढते व्यसनाधीनता आणि टवाळखोरांवर चाप लावण्यासाठी नवनियुक्त पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी कंबर कसली आहे. शहरात आयोजित पहिल्याच पत्रकार परिषदेत त्यांनी तालुक्याला नशामुक्त आणि गुन्हेगारीमुक्त करण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला. यावेळी तालुक्यातील सर्व स्थानिक पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पत्रकार परिषदेतील मुख्य मुद्दे आणि पोलीस प्रशासनाची आगामी रणनीती:
८ गावांतून व्यसनमुक्तीची ‘धडक मोहीम’: तालुक्यात दारू आणि अंमली पदार्थांचे प्रमाण रोखण्यासाठी पोलीस प्रशासन, डॉक्टर आणि पोलीस पाटिल यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या गुरुवारपासून गावोगावी विशेष कॅम्प आयोजित केले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात ८ गावांची निवड करण्यात आली असून, डॉक्टरांच्या मदतीने समुपदेशन व औषधोपचार करून व्यसनी लोकांचे मनपरिवर्तन केले जाईल.
टवाळखोरांसाठी ‘चिडीमार पथक’: शाळा-कॉलेज परिसरामध्ये विद्यार्थिनींची छेड काढणाऱ्या आणि त्रास देणाऱ्या रोडरोमियोंचा बंदोबस्त करण्यासाठी विशेष ‘चिडीमार पथक’ (स्क्वाड) तैनात केले जाईल आणि संबंधितांवर कडक दंडात्मक कारवाई होईल.
कागदपत्रे नसलेल्या वाहनांवर नजर: चोरीच्या गाड्या आणि विनाकागदपत्र धावणाऱ्या वाहनांची कसून चौकशी केली जाईल. वाहनधारकांनी सोबत आरसी बुक आणि लायसन्स बाळगणे बंधनकारक आहे, अन्यथा थेट कारवाई होईल.
मॉडिफाइड सायलेन्सर आणि ओव्हरलोडिंगवर बंदी: बुलेट व इतर गाड्यांना कर्कश आवाज करणारे सायलेन्सर लावून फिरणाऱ्यांवर आणि शाळकरी मुलांची ओव्हरलोडिंग वाहतूक करणाऱ्या वाहनांवर मोटर वाहन कायद्यानुसार कठोर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश पीआय केंद्रे यांनी दिले आहेत.
”तालुक्यात कोणताही बेकायदेशीर व्यवसाय खपवून घेतला जाणार नाही. नागरिकांनी कायद्याचे पालन करावे, अन्यथा पोलिसांचा कडक इंगा दाखवला जाईल,” असा सज्जड दमही पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी दिला आहे.



