शहर

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरील अतिक्रमण हटणार? शिवसेनेची आक्रमक भूमिका

मुख्य संपादक

उमरखेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या परिसरातील कथित अतिक्रमणाचा प्रश्न आता थेट राज्याच्या सत्ताकेंद्रापर्यंत पोहोचला आहे. शिवसेना शहर प्रमुख ॲड. संजीवकुमार जाधव आणि नुकतेच शिवसेनेत प्रवेश केलेले साहेबराव कांबळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना नेते यांची मुंबईतील नंदनवन निवासस्थानी भेट घेऊन हा गंभीर विषय त्यांच्या निदर्शनास आणून दिला.

भेटीदरम्यान उमरखेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अडसर ठरत असलेल्या कथित अतिक्रमित पेट्रोल पंपाच्या लीजबाबत चर्चा करण्यात आली. सार्वजनिक स्मारक, ऐतिहासिक वारसा आणि नागरिकांच्या भावनांशी संबंधित असलेल्या या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण अथवा नियमबाह्य बांधकाम असेल तर त्याची चौकशी होणे आणि कायद्यानुसार कारवाई होणे आवश्यक असल्याची भूमिका मांडण्यात आली.

शिवसेना शहर प्रमुख ॲड. संजीवकुमार जाधव यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे हा विषय ठामपणे मांडत संबंधित जागेची लीज, महसूल अभिलेख, नगरपरिषद परवानग्या आणि अतिक्रमणासंदर्भातील सर्व नोंदींची तपासणी करून आवश्यक ती कारवाई करण्याची मागणी केली. यावर सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित प्रकरणाची माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

साहेबराव कांबळे यांनी यावेळी उमरखेड शहरात शिवसेनेची संघटनात्मक बांधणी वेगाने सुरू असल्याचे सांगत, शहर प्रमुख ॲड. संजीवकुमार जाधव हे आक्रमक, अभ्यासू आणि जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणारे युवा नेतृत्व असल्याचे गौरवोद्गार काढले.

जनतेचा सवाल

जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरील जागेवर नियमबाह्य लीज, अतिक्रमण किंवा परवानगीतील त्रुटी असतील, तर संबंधित अधिकारी आणि जबाबदार व्यक्तींवर कारवाई होणार का? शहराच्या अस्मितेशी निगडित या प्रश्नावर प्रशासन आता कोणती भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

“छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या सन्मानाच्या आड येणारे कोणतेही अतिक्रमण सहन केले जाणार नाही. कायदा सर्वांसाठी समान आहे आणि नियमबाह्य बाबी उघड झाल्यास कारवाई अटळ आहे,” असा स्पष्ट संदेश या भेटीतून दिला गेल्याची चर्चा शहरात रंगली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button