महागाव येथील घरफोडी चोरीचा गुन्हा उघडकीस; 100 टक्के मुद्देमाल जप्त, एक आरोपी ताब्यात

महागाव, प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव पोलीस स्टेशन हद्दीतील कला व वाणिज्य महाविद्यालयात झालेल्या घरफोडी चोरीच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळच्या पथकाने यशस्वी छडा लावत 100 टक्के मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून इतर साथीदारांचा शोध सुरू आहे.
महाविद्यालयाच्या कार्यालयाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी संगणक साहित्य, प्रिंटर व इतर साहित्य चोरी करून नेल्याची तक्रार महागाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी महागाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक 219/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 305, 331(3) व 331(4) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता.
पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू केला. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित सूरज प्रकाश पवार (वय 24, रा. फुलसावंगी, ता. महागाव) याला ताब्यात घेऊन चौकशी केली. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या आरोपीने अखेर गुन्ह्याची कबुली दिली.
आरोपी व त्याच्या अन्य तीन साथीदारांनी मिळून महाविद्यालयात चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडून चोरीस गेलेला दोन सीपीयू, एक संगणक मॉनिटर, एक प्रिंटर तसेच की-बोर्ड व माऊस असा सुमारे 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामुळे गुन्ह्याची उकल होऊन चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.
या प्रकरणात एक आरोपी निष्पन्न करण्यात आला असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. पुढील तपास महागाव पोलीस स्टेशनकडून करण्यात येत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंथा, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चव्हाण तसेच त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.



