रोडवर अपघातांची मालिका; भरधाव वाहनांच्या धडका ठरत आहेत जीवघेण्या

महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव तालुक्यासह जिल्ह्यातील प्रमुख मार्गांवर भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे अपघातांची मालिका सुरूच असून निष्पाप नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत. वाहतूक नियमांचे उल्लंघन, अतिवेग आणि निष्काळजी वाहनचालकांमुळे अपघातांचे प्रमाण वाढत असून अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळत आहे.
तुळजापूर-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील विटमुटी परिसरात ४ जून २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजताच्या सुमारास भरधाव आयशर वाहनाने ट्रॅक्टर-ट्रॉलीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात २७ वर्षीय मजूर दिनेश देवराज हुंबे याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
गेल्या काही महिन्यांत महागाव तालुक्यासह जिल्ह्यातील विविध मार्गांवर अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अतिवेग, निष्काळजीपणा आणि वाहतूक नियमांकडे होणारे दुर्लक्ष यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. विशेषतः राष्ट्रीय महामार्गांवर अवजड वाहने मोठ्या वेगाने धावत असल्याने इतर वाहनचालक व पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या वाढत्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून भरधाव वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. रस्त्यांवर वेगमर्यादेची प्रभावी अंमलबजावणी, सीसीटीव्ही यंत्रणा उभारणे, वाहतूक पोलिसांची गस्त वाढविणे तसेच धोकादायक ठिकाणी विशेष तपासणी मोहीम राबविण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
दरम्यान, संबंधित आयशर वाहन भोसाचेक तपासणी नाक्यावरून गेल्यानंतरही त्याची तपासणी अथवा अडवणूक का करण्यात आली नाही, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. अपघातास कारणीभूत ठरलेल्या वाहनांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यात यंत्रणा कुठे कमी पडली, याची चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणीही होत आहे.
वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने प्रभावी उपाययोजना राबवून नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



