“१५ सप्टेंबरपर्यंत निर्णय घ्या, अन्यथा २९ सप्टेंबरला मुंबई जाम!”

उपवर्गीकरणासाठी उमरखेडमध्ये मातंग समाजाचा विराट एल्गार; हजारोंचा जनआक्रोश मोर्चा
सहसंपादक शेख मुजाहिद
उमरखेड | अनुसूचित जातीतील वंचित व अविकसित घटकांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात न्याय आणि विकासाच्या समान संधी मिळाव्यात, यासाठी अनुसूचित जातींचे ‘अ, ब, क, ड’ पद्धतीने उपवर्गीकरण करण्याच्या मागणीने आता आक्रमक रूप धारण केले आहे. या मागणीसाठी बुधवारी उमरखेड शहरात मातंग समाजाच्या वतीने हजारोंच्या संख्येने जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. माजी आमदार नामदेव ससाणे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात महिला, युवकांसह मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले होते.
स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणातून मोर्चाला सुरुवात झाली. शहरातील प्रमुख मार्गांवरून घोषणाबाजी करत मोर्चेकरी महागाव मार्गावरील उपविभागीय कार्यालयाकडे रवाना झाले. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमा व पुतळ्यांना अभिवादन करून मोर्चा पुढे मार्गस्थ झाला.

ढोल-ताशांचा गजर, महामानवांच्या प्रतिमा असलेला रथ आणि हजारोंचा जनसमुदाय यामुळे उमरखेड शहरातील वातावरण अक्षरशः दणाणून गेले. विशेषतः महिलांची मोठी उपस्थिती या आंदोलनाचे लक्षवेधी वैशिष्ट्य ठरले.
उपविभागीय कार्यालयावर पोहोचल्यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी विविध मान्यवरांनी शासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत उपवर्गीकरणाचा निर्णय तातडीने घेण्याची जोरदार मागणी केली.
माजी आमदार नामदेव ससाणे यांनी आपल्या भाषणातून शासनाला स्पष्ट इशारा दिला. ते म्हणाले की, “उपवर्गीकरणाच्या आंदोलनाचा केंद्रबिंदू उमरखेड आहे. वंचित समाजातील घटकांना न्याय आणि विकासाची समान संधी मिळेपर्यंत मातंग समाजाचा संघर्ष थांबणार नाही.”
अनुसूचित जातीतील ५९ जातींच्या विकासासाठी १९८७ मध्ये बार्टीची स्थापना करण्यात आली. मात्र, अपेक्षित न्याय मिळाला असता तर मातंग समाजाला रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ आली नसती, असा सवाल ससाणे यांनी उपस्थित केला. विविध शासकीय योजनांच्या लाभांचे वितरण, मातंग समाजासाठी स्वतंत्र संस्था, लहुजी साळवे स्मारकासाठी जागा तसेच अण्णाभाऊ साठे स्मारकाच्या कामासंदर्भातही त्यांनी शासनाच्या निर्णयांचा उल्लेख केला.
उपवर्गीकरणाच्या मागणीवरून होत असलेल्या आरोप-प्रत्यारोपांवरही ससाणे यांनी जोरदार टीका केली. उपवर्गीकरणाची मागणी कोणत्याही एका राजकीय पक्षाशी संबंधित नसून ती वंचित समाजाच्या न्यायाच्या लढ्याचा भाग असल्याचा दावा त्यांनी केला.
यावेळी मारोतराव वाडेकर, गणपत भिसे, के. डी. पवार, धूपताबाई कांबळे, संजय कंठाळे, के. मूर्ती, डॉ. अंकुश गोतावळे, विजय रणखांब, गुणवंत काळे, लहुजी सेनेचे प्रदेशाध्यक्ष कैलास खंदारे आदींनी मार्गदर्शन केले.
सभेचे प्रास्ताविक दत्तात्रय काळे यांनी केले. सूत्रसंचालन राजू गायकवाड व जय बनसोडे यांनी केले, तर आभार कृष्णा लामटिळे यांनी मानले. राष्ट्रगीताने सभेची सांगता झाली.
दरम्यान, उमरखेड तालुक्यातील विविध गावांतून मोठ्या संख्येने समाजबांधव या मोर्चात सहभागी झाले होते. अखेर मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांच्या वतीने नायब तहसीलदार सुभाष पाईकराव यांनी स्वीकारले.
१५ सप्टेंबरची डेडलाईन; २९ सप्टेंबरला मुंबईत महासंग्रामाचा इशारा
उपवर्गीकरणाचा प्रश्न १५ सप्टेंबरपर्यंत मार्गी न लागल्यास २९ सप्टेंबर रोजी मुंबईत भव्य आंदोलन करून मुंबई जाम करण्याचा इशारा माजी आमदार नामदेव ससाणे यांनी सभेत दिला.
उमरखेडमध्ये हजारोंच्या संख्येने झालेला हा जनआक्रोश मोर्चा केवळ स्थानिक आंदोलन न राहता उपवर्गीकरणाच्या मागणीला व्यापक आंदोलनाचे स्वरूप देण्याचा इशारा ठरला आहे. आता शासन या मागणीवर कोणती भूमिका घेते, याकडे मातंग समाजासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.



