Uncategorizedशहर

शेतकरी व गरीबांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी काँग्रेसचे तहसील कार्यालयावर निवेदन


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शेतकरी व गरीब नागरिकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत तहसीलदार कार्यालय, महागाव येथे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ पीक विम्याची रक्कम मिळावी तसेच घरकुल योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मंजुरी देऊन रखडलेले हप्ते त्वरित वितरित करण्यात यावेत, अशी जोरदार मागणी करण्यात आली.
निवेदनात नमूद करण्यात आले की, महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी आर्थिक अडचणींवर मात करत पीक विमा भरला होता. मात्र नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान होऊनही अनेक शेतकरी अद्याप विमा भरपाईपासून वंचित आहेत. विमा कंपन्यांच्या संथ कारभारामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून नुकसानभरपाई वितरित करावी, अशी मागणी करण्यात आली.
तसेच ‘सर्वांसाठी घरे’ या योजनेंतर्गत अनेक गरीब व गरजू कुटुंबांचे प्रस्ताव प्रलंबित असून काही लाभार्थ्यांची घरकुलांची कामे हप्ते न मिळाल्याने अर्धवट अवस्थेत आहेत. पावसाळा तोंडावर आल्याने या कुटुंबांच्या निवाऱ्याचा प्रश्न गंभीर बनल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.
तालुका काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की, येत्या ८ ते १० दिवसांत मागण्यांवर सकारात्मक निर्णय न घेतल्यास तहसीलदार कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
निवेदन देताना यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. सचिन भाऊ नाईक, महागाव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शिवाजीराव देशमुख, महागाव शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शैलेश कोपरकर, अनुसूचित विभागाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र कावळे, महागाव तालुका जिनिंग प्रेसिंगचे अध्यक्ष तथा नगरसेवक संभाजीराव नरवाडे, वनमालाताई राठोड, सुनील भाऊ राठोड, सुनील भवानकर, बाळासाहेब येणकर, स्वप्निल नाईक यांच्यासह काँग्रेस पक्षाचे शेकडो कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button