वार्ड क्रमांक १३ चा अजब कारभार: नाल्यांमधून ‘अमृत’ बाहेर पडून थेट मुख्य रस्त्यावर; त्रस्त नागरिकांचा नगरपंचायतीला संतप्त सवाल!

हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी शेख खय्यूम)
: येथील नगरपंचायत प्रशासनाचा एक अत्यंत बेजबाबदार कारभार समोर आला आहे. वार्ड क्रमांक १३ मधील रस्त्यावरून वाहणाऱ्या सांडपाण्याकडे प्रशासन असे पाहत आहे, जणू काही नाल्यांमधून घाण पाणी नाही तर एखादी अत्यंत मौल्यवान वस्तू किंवा थेट ‘अमृत’ बाहेर पडून रस्त्यावर वाहत आहे! प्रशासनाच्या या अक्षम्य दुर्लक्षामुळे मुख्य रस्त्यांवर दुर्गंधीयुक्त पाण्याचा पूर आला असून नागरिकांचे चालणे-फिरणे कठीण झाले आहे.
याचा सर्वात मोठा फटका येथील मस्जिद-ए-रहीम कडे जाणाऱ्या नमाज पठण करणाऱ्या नागरिकांना आणि पादचाऱ्यांना बसत आहे. रस्त्यावर सर्वत्र सांडपाणी साचल्यामुळे पवित्र स्थळी जाणाऱ्या लोकांना आणि सामान्य नागरिकांना रस्त्यावरून चालताना स्वतः कसरत करत, दगड-धोंडे टाकून मार्ग काढावा लागत आहे.
अधिकारी एसी केबिन सोडून बाहेर कधी पडणार?
या गंभीर समस्येमुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून, नगरपंचायतीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. “हे जबाबदार अधिकारी फक्त नगरपंचायतीच्या बंद एसी केबिनमध्ये आणि स्वतःच्या खोलीतच बसून राहणार का? आपल्या आरामदायक रूममधून बाहेर पडून हे अधिकारी थेट रस्त्यावर येऊन लोकांचे प्रश्न का सोडवत नाहीत?” असा थेट आणि रोखठोक सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
स्थानिक नगरसेवकांचे या गंभीर समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले असल्याचा थेट आरोप नागरिकांनी केला आहे. उन्हाळ्यातच जर रस्त्यांची ही भयानक अवस्था असेल, तर आगामी पावसाळ्यात येथील जनजीवन पूर्णपणे कोलमडण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे आता स्वतः नगराध्यक्षांनीच तात्काळ या जागेवर येऊन पाहणी करावी आणि नागरिकांचा हा चालण्या-फिरण्याचा प्रश्न युद्धपातळीवर मार्गी लावावा, अशी आग्रही मागणी केली जात आहे.



