फुलसांगवी येथील कोल्ड्रिंक्स गोदामाला भीषण आग; जीवितहानी टळली

महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
तालुक्यातील फुलसांगवी येथे रस्त्यालगत असलेल्या एका कोल्ड्रिंक्स गोदामाला बुधवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. प्रचंड उष्णतेच्या पार्श्वभूमीवर लागलेल्या या आगीत काही वेळातच संपूर्ण गोदाम जळून खाक झाले. घटनेनंतर परिसरात काळ्या धुराचे लोट पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
गोदामामध्ये कोल्ड्रिंक्सच्या पेट्या, बिसलेरी बाटल्या, फ्रिज, इन्व्हर्टर तसेच इतर साहित्य मोठ्या प्रमाणात साठवून ठेवण्यात आले होते. आगीत अंदाजे १ लाख २० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. महसूल प्रशासनाला तत्काळ माहिती देण्यात आली तसेच अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, गोदाम मालकाने नुकसानभरपाईची मागणी केली आहे.
महागाव नगरपंचायतीच्या फायर ब्रिगेडवर प्रश्नचिन्ह
या घटनेनंतर महागाव नगरपंचायत यांच्या फायर ब्रिगेड व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. लाखो रुपये खर्च करून खरेदी करण्यात आलेली फायर ब्रिगेड गाडी अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे आग विझवण्यासाठी वेळेत मदत मिळू शकली नाही.
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अखेर उंबरखेड नगरपालिका येथून फायर ब्रिगेड गाडी बोलवावी लागली. तालुक्याच्या ठिकाणी असलेली फायर ब्रिगेड गाडी केवळ शोभेची वस्तू बनल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत असून प्रशासनाविरोधात नाराजी वाढताना दिसत आहे.



