उर्दू एज्युकेशन असोसिएशनकडून शिक्षण अधिकाऱ्यांचा सत्कार; शैक्षणिक प्रश्नांवर ठोस कृतीची अपेक्षा

अमरावती : उर्दू एज्युकेशन असोसिएशन सोसायटीच्या वतीने शिक्षण अधिकारी (प्राथमिक), अमरावती यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी हाजी मोहम्मद सिद्दीक, मुख्याध्यापक साबिर खान आणि सोहेल हुसैन उपस्थित होते.
उर्दू माध्यमातील शाळा, विद्यार्थी आणि शिक्षकांच्या विविध शैक्षणिक प्रश्नांवर प्रशासनाने केवळ सत्कार आणि औपचारिक भेटीपुरते मर्यादित न राहता ठोस प्रशासकीय निर्णय व प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त होत आहे.
उर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षकांची उपलब्धता, विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक सुविधा, शाळांच्या मूलभूत गरजा, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी तसेच प्रलंबित प्रशासकीय प्रश्न याकडे संबंधित विभागाने गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. विशेषतः प्राथमिक शिक्षणाचा प्रश्न असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्कांशी संबंधित बाबींमध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई अथवा दुर्लक्ष होऊ नये, अशी मागणी शिक्षणप्रेमी नागरिकांकडून होत आहे.
सत्कार स्वीकारणे ही केवळ औपचारिकता न राहता उर्दू शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न सोडविण्याची जबाबदारी प्रशासनाने स्वीकारावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. संबंधित शाळांची प्रत्यक्ष पाहणी करून समस्या, शिक्षकांची आवश्यकता, पायाभूत सुविधा आणि विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शैक्षणिक सुविधांचा वस्तुनिष्ठ आढावा घेण्याची गरज आहे.
दरम्यान, उर्दू एज्युकेशन असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षण विभागासमोर शैक्षणिक प्रश्न प्रभावीपणे मांडून त्यावर लेखी निर्णय व कालबद्ध कार्यवाहीची मागणी करावी, अशीही चर्चा सुरू झाली आहे.
सत्काराला सामाजिक आणि शैक्षणिक बांधिलकीची जोड मिळणार का?
हा प्रश्न आता महत्त्वाचा ठरला असून, शिक्षण अधिकाऱ्यांकडून उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांच्या हितासाठी प्रत्यक्षात कोणती पावले उचलली जातात, याकडे पालक, शिक्षक आणि शिक्षणप्रेमी नागरिकांचे लक्ष लागले आहे.



