Uncategorized

गाळणच्या विलासची बैंगलोर पर्यंत शैक्षणिक झेप.

जळगाव : पाचोरा तालुक्यातील गाळण या छोट्याशा गावातील विलास गणेश राठोड यांची प्रतिष्ठित इंडियन इन्स्टिट्यूट फॉर ह्यूमन सेटलमेंट विद्यापीठ, बेंगलोर साठी निवड झाली असून विलास हा तांड्यातील पदव्युत्तर शिक्षणासाठी बेंगलोरला जाणारा पहिला मुलगा आहे. विलास हा एका गरीब अल्पभूधारक शेतकरी कुटुंबात वाढलेला अभ्यासू होतकरू मुलगा आहे. कुटुंबात एकूण ५ लोक आहेत त्यामध्ये आई-वडील विलासची लहान बहिण आणि त्याचा लहान भाऊ. आई-वडील दोन्ही शेती काम करतात. कौटुंबिक परिस्थिती जेमतेम असल्याने तिन्ही मुलांना शिक्षण शक्य देणे शक्य नव्हते त्यामुळे विलासच्या लहान बहिणीला सातवी नंतर शिक्षण सोडावे लागले आणि शाळा सोडल्यानंतर बहिण वंदना आई-वडीलांना शेती कामात मदत करू लागली आणि लहान भाऊ आता बारावी पास झाला आहे.
विलास ने पहिली ते बारावी पर्यंत शिक्षण वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा गाळण येथेच पूर्ण केले. विलास शाळेपासूनच अभ्यासात हुशार होता परंतु शैक्षणिक सोयी सुविधांचा अभाव, तांड्यात होणारे बालविवाह, गावातील व्यसनाधीनता, पावसाची अनियमिता, पिकाला नसलेला हमीभाव यासारख्या बऱ्याच समस्या विलासने जवळुन बघितल्या. दरवर्षी होणारी नापिकी, वाढणारे कर्ज आणि या कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले वडिल अशा अनेक सामाजिक समस्यांमुळे विलासला समाजासाठी काहीतरी करावं असं नेहमी वाटायचं. त्यांसाठी खूप शिकावं आणि सक्षम बनावं लागेल हे देखील त्याला शालेय वयातच उमजलं म्हणून बारावी गावातच पूर्ण केल्यानंतर विलासला समाजकार्य स्नातक (बी.एस.डब्ल्यू) पदवी बद्दल माहिती झालं. लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय,जळगाव येथून समाजकार्य स्नातक पदवी पूर्ण केली. बी.एस.डब्ल्यू. करतानाच विलासने महिला सशक्तीकरणावर देखील काम केले. धानवड गावांमध्ये फिल्ड वर्क करत असताना अनेक सामाजिक विषयाला घेऊन आणि युवा विकासावर आधारित वेगवेगळ्या कार्यशाळा आणि शिबिरे घेतली. गावातील शाळेत कधीच कोणती स्पर्धा किंवा कार्यक्रम आयोजित केले जात नव्हते. यामुळे आपले कलागुण प्रदर्शन करण्यासाठी विलासला शालेय वयात स्टेज मिळाला नाही. यावर विलास म्हणतो ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये देखील प्रचंड क्षमता असतात परंतु संधी न मिळाल्याने त्यांच्यामधील क्षमतांचा विकास होत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संधी मिळाल्यास ते देखील यश संपादन करु शकतात असं तो म्हणतो. या बरोबरच आपण समाजाचं देणं लागतो ही भावना त्याच्या मनात होती समाजासाठी काम करायचं ही प्रेरणा आजही त्याच्यात जिवंत आहे. विलासने बी‌‌.एस.डब्ल्यू‌. शिक्षण पूर्ण करत असताना त्यांनी स्वतःचा शैक्षणिक खर्च भागवण्यासाठी पार्ट टाइम हॉटेलवर पण काम केले व समाजकार्य पदवीचे शिक्षण पूर्ण केले. पदवीच्या शिक्षणासोबतच उच्च शिक्षण नामवंत शिक्षण संस्थांमधून पूर्ण करण्याची जिद्द उराशी बाळगून तयारी करत होता. आता विलासची नुकतीच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ह्यूमन सेटलमेंट विद्यापीठ बेंगलोर येथे एम‌. एस. सी. क्लायमेट चेंज सायन्स अँड प्रॅक्टिस या दोन वर्षीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे. त्याची गुणवत्ता आणि जिज्ञासा बघून विद्यापीठाने त्याला १५ लाख ६५ हजार ५२८ रुपये शिष्यवृत्ती म्हणून प्रदान केले आहे आणि सोबतच त्याला इतर शैक्षणिक खर्चासाठी दर महिन्याला ८ हजार रुपये स्टायफंड मिळणार आहे. विलासचे वडील असे म्हणतात की, “आम्हाला शिक्षण घेण्याची संधी मिळाली नाही, पण माझ्या मुलांनी मात्र मनापासून आणि जितके शिकायचे आहे तितके शिक्षण घ्यावे.” विलासचे वडील शेतीचे काम करतात तसेच त्यांचा बकरी पालनाचा व्यवसाय आहे. त्यांनी स्वतः शिक्षण घेतले नसले तरी आपल्या मुलांना पूर्ण शिक्षण द्यायचे, त्यांना मोठे बनवायचे, हीच त्यांची जिद्द आणि इच्छा आहे. विलास म्हणतो येत्या काळात तांड्यातील आणि गावातील अनेक विद्यार्थी ग्रामीण भागातून आंतरराष्ट्रीय विद्यापीठात शिकायला जातील यासाठी प्रयत्नशील राहील. विलासच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्याचे कौतुक होत आहे. त्याची ही उच्च शिक्षणाची भरारी संपूर्ण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रेरणा देत आहे. तो आपल्या या यशाचे श्रेय आई-वडील आणि शिक्षकांना देतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button