मानव विकासच्या बस सेवा बंद; सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींचा संताप

महागावप्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव येथील सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयातील विद्यार्थिनींसाठी चालविण्यात येणाऱ्या मानव विकास योजनेअंतर्गत बस सेवा अचानक बंद करण्यात आल्याने विद्यार्थिनींमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या बस नियमितपणे पूर्ण क्षमतेने भरून धावत असतानाही पुसद आगार प्रशासनाने कोणतेही ठोस कारण न देता तीन बस सेवा बंद केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
विद्यार्थिनींनी पुसद आगार व्यवस्थापकांना या निर्णयाबाबत जाब विचारला असता, “विद्यार्थिनींचे बस पास पुसद आगारातूनच काढावेत,” या कारणामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. मात्र, महागाव तालुक्यातील विद्यार्थिनी महागाव येथूनच बस पास काढत असल्याने पुसद आगाराशी त्यांचा थेट संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बस सेवा बंद झाल्यामुळे अनेक विद्यार्थिनींना वेळेवर शाळेत पोहोचणे कठीण होत असून त्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. काही विद्यार्थिनींना आर्थिक अडचणींमुळे खासगी वाहनांचा पर्यायही उपलब्ध नसल्याने शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ येत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्यांनी मानव विकास योजनेच्या बस सेवा तात्काळ पूर्ववत सुरू कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
विद्यार्थिनींनीही मानव विकास योजनेअंतर्गत पूर्वीप्रमाणे बस सेवा सुरू करून शिक्षणासाठी आवश्यक वाहतूक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी केली आहे. विद्यार्थिनींच्या शिक्षणात अडथळे निर्माण होण्यास जबाबदार कोण, असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला आहे.



