Uncategorized

महागाव तालुक्यात हॉटेलमध्ये घरगुती गॅसचा वापर; सिलेंडर टंचाईमुळे नागरिक त्रस्त


महागाव, प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यात अनेक हॉटेल, चहा कॅन्टीन व लहान व्यावसायिकांकडून घरगुती गॅस सिलेंडरचा सर्रास वापर होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. यामुळे घरगुती गॅसची टंचाई निर्माण झाली असून सामान्य ग्राहकांना सिलेंडर मिळवण्यासाठी मोठी धावपळ करावी लागत आहे.
आज सकाळपासून महागाव शहरातील गॅस एजन्सीवर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. अनेक ग्राहकांनी सिलेंडरसाठी बुकिंग करूनही वेळेत गॅस मिळत नसल्याची तक्रार केली. एजन्सीकडून ग्राहकांना बुकिंग करून ओटीपी घेतल्याशिवाय गॅस मिळणार नसल्याची माहिती देण्यात येत आहे.
दरम्यान, तहसील कार्यालयासमोर तसेच तालुक्यातील अनेक हॉटेल व चहा कॅन्टीनमध्ये घरगुती गॅसचा वापर होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असतानाही अशा प्रकारच्या गैरवापरावर कारवाई होत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
गुंज, धनोडा, फुलसंगी, हिवरा, मुडाणा, मोरथ, काळीदौलतखान व पोखरी या भागातही काही जण घरगुती गॅसचा साठा करून काळाबाजार करत असल्याचा आरोप होत आहे. काही ठिकाणी घरगुती सिलेंडरमधून मोठ्या व्यावसायिक सिलेंडरमध्ये गॅस ट्रान्सफर केला जात असल्याचीही चर्चा आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे तातडीने लक्ष देऊन जिल्हा पुरवठा विभागामार्फत पुसद, उमरखेड व महागाव परिसरात तपासणी मोहीम राबवावी आणि काळाबाजार व घरगुती गॅसचा गैरवापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button