शहर

तहसील व एसडीओ कार्यालयात कर्मचाऱ्यांचा संप — जनतेची उन्हात होरपळ, प्रशासन कुठे झोपले?

मुख्य संपादक शेख इरफान

उमरखेड तहसील कार्यालय व एसडीओ कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे सर्वसामान्य जनतेचे अक्षरशः हाल होत आहेत. सरकारी कामांसाठी दुर्गम व बंदी भागातून आलेले नागरिक दिवसभर उन्हात ताटकळत उभे राहून त्रस्त झाले असून, प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
तहसील व एसडीओ कार्यालयातील अत्यावश्यक सेवा पूर्णपणे ठप्प झाल्याने जात प्रमाणपत्र, उत्पन्न दाखले, जमीन नोंदी, विविध अर्ज प्रक्रिया या कामांसाठी आलेल्या नागरिकांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे. विशेषतः शेतकरी, महिला व वृद्ध नागरिकांना या परिस्थितीचा मोठा फटका बसत आहे.
“आम्ही 20-30 किमी अंतरावरून पैसे खर्च करून आलो, पण इथे येऊन कळतं की कर्मचारी संपावर आहेत. ना कोणती सूचना, ना पर्यायी व्यवस्था. दिवसभर उन्हात उभं राहून परत जावं लागतं,” अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी दिली.
उन्हाळ्याच्या कडक तापमानात पिण्याच्या पाण्याचीही योग्य सोय नसल्याने नागरिकांची अवस्था अधिक बिकट झाली आहे. प्रशासनाने संपाच्या पार्श्वभूमीवर कोणतीही आपत्कालीन यंत्रणा उभी केली नसल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे.
दरम्यान, कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी संप सुरु असला तरी त्याचा थेट फटका गोरगरीब जनतेला बसत असल्याने हा प्रकार गंभीर मानला जात आहे.
प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून किमान अत्यावश्यक सेवा सुरु कराव्यात, अन्यथा नागरिकांचा रोष उग्र रूप धारण करू शकतो, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button