महागाव ग्रामीण रुग्णालयात राडा; तोडफोड, नर्ससह कर्मचाऱ्यांना मारहाण डॉक्टर संघटनांचे पोलिस ठाण्यात निवेदन; आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव : महागाव ग्रामीण रुग्णालयात १८ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास राडा घालत काचांची तोडफोड करून नर्ससह रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची गंभीर घटना घडली. या घटनेनंतर काही कर्मचाऱ्यांना जीवाच्या भीतीने लपून बसण्याची वेळ आल्याचे सांगण्यात येत आहे.
या प्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ. दिक्षा किशोर मुजमुले यांनी महागाव पोलिस ठाण्यात जबानी रिपोर्ट दिला आहे. मात्र, रिपोर्टमध्ये आरोपींची नावे नमूद नसल्याने पोलिसांसमोर आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.
घटनेचा निषेध करत आज विविध डॉक्टर संघटनांचे पदाधिकारी व डॉक्टरांनी महागाव पोलिस ठाण्यात धाव घेत ठाणेदार वानखडे यांना लेखी निवेदन दिले. रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
दरम्यान, उंबरखेड येथेही डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन करून घटनेचा निषेध केला. यवतमाळ जिल्ह्यातील विविध ठिकाणी डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांनी या घटनेविरोधात संताप व्यक्त केला.
घटनेची गंभीर दखल घेत महागाव पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी पथक नेमले असून, लवकरच आरोपींना अटक केली जाईल, अशी माहिती ठाणेदार वानखडे यांनी दिली. कोणाचीही गय केली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महागाव शहरात रात्रीच्या वेळी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींच्या हालचाली वाढल्याचे चित्र दिसून येत असल्याने पोलिसांकडून रात्रीची गस्त अधिक प्रभावी करण्यात येणार आहे. रात्री ११ ते १२ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याने पेट्रोलिंग वाढवून संशयितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे ठाणेदार वानखडे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.
दरम्यान, या घटनेमुळे ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, आरोग्य कर्मचाऱ्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.



