शहर

उमरखेड पोलिसांची धडाकेबाज कारवाई मिसिंग व चोरीचे २५ मोबाईल शोधून मुळ मालकांच्या स्वाधीन

उमरखेड, दि. २४ ऑगस्ट २०२६ : उमरखेड पोलीस स्टेशन हद्दीत मागील काही दिवसांपासून मोबाईल हरविणे तसेच चोरीस जाण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची बाब गांभीर्याने घेत उमरखेड पोलिसांनी विशेष मोहीम राबवून मिसिंग व चोरीचे तब्बल २५ मोबाईल शोधून काढत ते मुळ मालकांच्या स्वाधीन केले.

पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या सूचनेनुसार ठाणेदार पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांनी उमरखेड पोलीस स्टेशनचे डी.बी. प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे व त्यांच्या पथकाला हरविलेले व चोरीचे मोबाईल शोधण्याच्या सूचना दिल्या.

त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मागील दोन महिन्यांतील मिसिंग व चोरीच्या मोबाईल प्रकरणांचा आढावा घेतला. CEIR पोर्टल, तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती तसेच विविध तांत्रिक बाबींचा वापर करून मोबाईलचा शोध घेण्यात आला.

शोधमोहीमेदरम्यान काही मोबाईल परराज्यात पोहोचल्याचे निदर्शनास आले. मात्र, पोलिसांच्या गोपनीय यंत्रणेला सक्रिय करून तसेच सातत्याने पाठपुरावा आणि तांत्रिक कौशल्याचा वापर करून पोलिसांनी हे मोबाईलही शोधून काढले.

या कारवाईत एकूण २५ मोबाईल हस्तगत करण्यात आले. हे मोबाईल आज दि. २४ ऑगस्ट २०२६ रोजी संबंधित २५ तक्रारदारांना ठाणेदार पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांच्या हस्ते सुस्थितीत परत करण्यात आले. आपले हरविलेले मोबाईल पुन्हा मिळाल्याने नागरिकांनी उमरखेड पोलिसांचे आभार मानत समाधान व आनंद व्यक्त केला.

नागरिकांना पोलिसांचे आवाहन

ठाणेदार पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, केवळ कमी किमतीत मिळत आहे म्हणून सेकंड हॅण्ड मोबाईल खरेदी करू नये. सदर मोबाईल चोरीचा अथवा एखाद्या गुन्ह्यात वापरलेला असण्याची शक्यता असल्याने तो खरेदी करणाऱ्या व्यक्तीलाही कायदेशीर अडचणींना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे मोबाईल खरेदी करताना त्याची योग्य कागदपत्रे, बिल व वैधता तपासणे आवश्यक आहे.

तसेच नागरिकांना रस्त्यावर किंवा अन्य ठिकाणी मोबाईल सापडल्यास तो स्वतःकडे न ठेवता जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जमा करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी कारवाई

सदर कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी अमर मोहिते (पुसद विभाग, उमरखेड उपविभागाचा चार्ज) तसेच ठाणेदार पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईत डी.बी. प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे, सहायक फौजदार विजय पतंगे, पोलीस हवालदार अतुल तागडे, संतोष राठोड, चंदन जाधव, पोलीस कॉन्स्टेबल संघशिल टेंभरे, विष्णू राठोड, दिगांबर गिते तसेच उमरखेड पोलीस स्टेशनच्या पथकाने परिश्रम घेतले.

हरविलेला मोबाईल परत मिळवून देत उमरखेड पोलिसांनी नागरिकांचा विश्वास अधिक दृढ केला असून, तांत्रिक तपासाच्या माध्यमातून चोरी व मिसिंग मोबाईल शोधण्याच्या कारवाईला मिळालेले हे यश उल्लेखनीय ठरले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button