शहर

एक कोटीच्या ‘नमो उद्यान’ निविदेत गैरव्यवहाराचा संशय; महागाव नगरपंचायतीवर शासन निर्देशांकडे दुर्लक्षाचा आरोप


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव : शहरातील प्रभाग क्रमांक २ मध्ये ‘नमो उद्यान’ उभारण्यासाठी सुमारे एक कोटी रुपयांच्या कामाची ई-निविदा नगरपंचायतीने काढली असून, या प्रक्रियेत गैरव्यवहाराचा संशय व्यक्त केला जात आहे. निविदेत जाणीवपूर्वक कठोर अटी व शर्ती ठेवून काही ठराविक कंत्राटदारांना फायदा करून देण्याचा डाव असल्याचा आरोप स्थानिक कंत्राटदारांकडून होत आहे.
तसेच, मुख्य कार्यकारी अधिकारी (प्रभारी, उमरखेड) यांच्या संगनमताने नगराध्यक्ष आणि उमरखेड येथून पूर्वी हकालपट्टी झालेल्या एका व्यक्तीमार्फत निविदा प्रक्रियेत हस्तक्षेप होत असल्याचीही चर्चा रंगू लागली आहे. संबंधित व्यक्ती मध्यस्थी करत निविदा ‘हँडल’ करण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र असल्याचा आरोप केला जात आहे.
एक कोटीच्या ‘नमो उद्यान’ निविदेत गैरव्यवहाराचा संशय; महागाव नगरपंचायतीवर शासन निर्देशांकडे दुर्लक्षाचा आरोपया कामासाठी १० एप्रिल ते १७ एप्रिल २०२६ दरम्यान ऑनलाइन पद्धतीने निविदा सादर करण्याची मुदत देण्यात आली असून, २० एप्रिल रोजी निविदा उघडण्यात येणार आहे. मात्र, निविदेतील काही अटींवर गंभीर आक्षेप घेण्यात आले आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार निविदा प्रक्रिया पारदर्शक असणे आवश्यक असताना, संबंधित अटी शासनाच्या निर्देशांशी विसंगत असल्याचा दावा केला जात आहे. विशेषतः अंदाजित खर्चापेक्षा कमी दर असल्यास ‘लिफाफा-२’ मध्ये अतिरिक्त हमी रक्कम सादर करण्याची अट घालण्यात आल्याने कंत्राटदारांमध्ये नाराजी आहे.
यापूर्वी शासन व न्यायालयाने अशा अटींबाबत स्पष्ट निर्देश देऊन काही बाबतीत शिथिलता दिली असतानाही नगरपंचायतीने जुन्याच पद्धतीच्या अटी कायम ठेवल्याचा आरोप आहे. त्यामुळे निविदा प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, यामागे काही ठराविक कंत्राटदारांना लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून निविदा प्रक्रिया पारदर्शकपणे राबवावी, अशी मागणी स्थानिक कंत्राटदार व नागरिकांकडून होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button