महागाव येथे श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथीनिमित्त भक्तीमय कार्यक्रमांचे आयोजन

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव येथे श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त ९ एप्रिल ते १५ एप्रिल २०२६ या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित महागाव केंद्राच्या वतीने भक्तीमय वातावरणात पार पडणार आहे.
या कालावधीत दररोज सकाळी ८ वाजता भूपाळी आरती, सकाळी १०.३० नंतर महानैवेद्य व सायंकाळी ६.३० वाजता आरती असे नियमित कार्यक्रम होणार आहेत. यासोबतच स्वामी चरित्र पारायण, महाप्रसाद व इतर धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
भक्तांना सहभागाचे आवाहन
पुसद रोडवरील केंद्रात होणाऱ्या या धार्मिक सोहळ्यात परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन पुण्यतिथीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सेवेकरी मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
दत्त संप्रदायातील थोर संत
श्री स्वामी समर्थ महाराज हे एकोणिसाव्या शतकातील दत्त संप्रदायातील थोर संत मानले जातात. त्यांना भगवान दत्तात्रेयांचा तिसरा पूर्ण अवतार मानले जाते. त्यांनी अक्कलकोट येथे दीर्घकाळ वास्तव्य केले.
“भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे” हा त्यांचा अभयमंत्र आजही भक्तांना प्रेरणा देतो. कर्दळी वनातून प्रकट होऊन त्यांनी महाराष्ट्रभर भ्रमण करत मानवकल्याणाचा संदेश दिला.



