हिमायतनगरच्या टेंबी रोडवर मृत्यूचा सापळा; प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा कोणाचा तरी ‘संसार’ बळी घेणार का?

हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी शेख खयुम):
अमराई पारडी पॉईंट ते टेंबी या अवघ्या ४ किलोमीटरच्या रस्त्याचे काम गेल्या ४ महिन्यांपासून रखडले असून, कंत्राटदाराच्या मुजोरीमुळे हा मार्ग आता मृत्यूचा सापळा बनला आहे. नुकताच साई मंदिराजवळ एक रिक्षा १५ फूट खोल खड्ड्यात उलटता उलटता वाचला. ईश्वर कार्पे यांच्या सतर्कतेमुळे प्रवाशांचे प्राण वाचले असले, तरी प्रशासनाच्या या ‘थिल्लर’ कारभारावर आता नागरिकांचा संयम सुटला आहे.
”एक व्यक्ती फक्त नागरिक नाही, तर एका कुटुंबाचा आधार असतो!”
रस्त्यावर चालणारा प्रत्येक व्यक्ती प्रशासनासाठी फक्त एक आकडा असू शकतो, पण आपल्या घरासाठी तो सर्वस्व असतो. जर या खराब रस्त्यामुळे कोणाचा जीव गेला, तर त्या कुटुंबाची होणारी अपरिमित हानी कोण भरून काढणार? “एखाद्याचा बळी गेल्यानंतरच शासन जागे होणार का?” असा जळजळीत सवाल असद मौलाना यांनी उपस्थित केला आहे. एकाच्या जाण्याने पूर्ण घर उध्वस्त होते, याची जाणीव सुस्त अधिकाऱ्यांना कधी होणार?
आजी-माजी लोकप्रतिनिधींवर नागरिकांचा रोष:
रस्त्याची ही भयावह अवस्था पाहून नागरिक आता आजी-माजी आमदार, खासदार आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना शिव्यांची लाखोली वाहात आहेत. ४ किमी रस्त्यासाठी ४ महिने लागतातच कसे? कंत्राटदारावर कोणाचा वरदहस्त आहे? असे प्रश्न आता विचारले जात आहेत.
प्रशासनाला इशारा:
जर तातडीने रस्ता दुरुस्त झाला नाही आणि पुन्हा एखादा अपघात घडला, तर होणाऱ्या परिणामांना प्रशासन आणि कंत्राटदार जबाबदार असेल, असा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे.



