जि. प. शाळेच्या जमिनीवर हर्रासदरम्यान केंद्राध्यक्षाला मारहाण; सहा जणांविरुद्ध गुन्हा

महागाव, प्रतिनिधी संजय नागरगोजे
जिल्हा परिषद शाळेच्या जमिनीवर हर्रास सुरू असताना केंद्राध्यक्षाला शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना महागाव तालुक्यातील पोखरी येथे घडली. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध महागाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संतोष भगवानराव केंद्रे (वय ४४) हे जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक मराठी शाळा, पोखरी येथील केंद्राध्यक्ष आहेत. दिनांक १३ मार्च रोजी ते शाळेच्या जमिनीवर हर्रासशीचे काम करत असताना काही जण तेथे आले. यावेळी आरोपींनी “ही जमीन आमच्या वडिलांची आहे, तुम्ही हराशी कशी करता” असे म्हणत वाद घातला.
वाद वाढताच आरोपींनी संतोष केंद्रे यांना शिवीगाळ करत चापट-बुक्क्यांनी मारहाण केली तसेच काम बंद न केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. यावेळी फिर्यादीकडे चटणीचे पाकीट फेकून देत धक्काबुक्की करण्यात आली. गावातील काही नागरिकांनी मध्यस्थी करून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ करत टेबल-खुर्च्यांची फेकाफेक केली व शासकीय कामात अडथळा निर्माण केला.
या घटनेप्रकरणी विश्वनाथ सदाशिव नांदे (२९), बाबाराव सदाशिव नांदे (२७), कपिल राम कावळे (१९), दिगंबर सदाशिव नांदे (४१) व इतर दोघांविरुद्ध महागाव पोलीस ठाण्यात भादंवि कलम १३२, ११५(२), १८९(२), १९१(२), १९०, ३५२, ३५१(२)(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पुढील तपास महागाव पोलीस करीत आहेत.



