महावितरणचा निर्लज्जपणा! बंद मीटर असतानाही ५५ हजारांचे बिल; गरिबांच्या जखमेवर मीठ चोळणारे प्रशासन शुद्धीवर येणार का?

हिमायतनगर ( ता प्रतिनिधी शेख खयुम खूरेशी):
महावितरणचा कारभार म्हणजे ‘आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय’ असा झाला आहे. हिमायतनगर तालुक्यातील आंदेगाव येथे एका गरीब मजुरी करणाऱ्या महिलेला बंद मीटर असतानाही तब्बल ५५,३०० रुपयांचा शॉक देऊन प्रशासनाने आपल्या अकार्यक्षमतेचा कळस गाठला आहे.
प्रशासनाचा आंधळा कारभार:
सविता विश्वनाथ उपलवाड या महिलेच्या बिलावर महावितरणने स्वतः ‘Faulty’ (नादुरुस्त) मीटर अशी नोंद केली आहे. जर मीटर बंद आहे, तर मग ५७५ युनिटचा आकडा आला कुठून? अधिकारी वातानुकूलित केबिनमध्ये बसून फक्त आकडेमोड करत आहेत का? असा संतप्त सवाल आता जनता विचारत आहे.
मिरवणुकीत मग्न की झोपेत?
एकीकडे सर्वसामान्य नागरिक महागाईने होरपळत असताना, महावितरणच्या या तांत्रिक दहशतवादामुळे गरीब कुटुंब हवालदिल झाले आहे. मजुरी करून पोट भरणारी महिला ५५ हजार रुपये भरणार कुठून? या प्रश्नाचे उत्तर द्यायला स्थानिक अभियंता किंवा कर्मचारी उपलब्ध नाहीत.



