वॉर्ड ७ मधील पाणी टंचाई निवारणासाठी नवीन बोरवेलचे काम पूर्ण; नगरसेवक प्रतिनिधींच्या तत्परतेमुळे नागरिकांमध्ये समाधान

हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी शेख खय्यूम): शहरातील वॉर्ड क्रमांक ७ मधील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची अडचण दूर करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. नगराध्यक्ष शेख रफिक आणि उपनगराध्यक्ष विनोद गुंडेवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज वॉर्डात नवीन बोरवेल घेण्याचे काम यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले.
यावेळी स्थानिक नगरसेविका, गट नेते व त्यांचे प्रतिनिधी रमेश पंडित, सरपे सर आणि वॉर्डातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून नगरसेवकांनी वैयक्तिक लक्ष देऊन हे काम अत्यंत कमी वेळात पूर्ण करून घेतले.
या प्रसंगी बोलताना प्रतिनिधी रमेश पंडित म्हणाले की, “हा वॉर्ड म्हणजे केवळ एक मतदारसंघ नसून माझे एक मोठे कुटुंब आहे आणि मी या कुटुंबाचा एक सदस्य आहे. माझ्या वॉर्डातील नागरिकांना पाणी, रस्ते, नाले किंवा कचऱ्याची कधीही कोणतीही अडचण भासू देणार नाही. तुमच्या प्रत्येक सुख-दुःखात मी सदैव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. भविष्यात प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी आम्ही ‘घर-घर नळ योजना’ राबवणार असून सर्वांना नळ कनेक्शन देणार आहे.”
काम सुरू असताना नगरसेवकांनी वॉर्डातील नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या इतर समस्याही जाणून घेतल्या. या तत्परतेमुळे आणि आगामी नळ योजनेच्या नियोजनामुळे प्रभागातील पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लागणार असल्याने स्थानिक रहिवाशांनी नगरसेवक आणि प्रशासनाचे आभार मानत मोठा आनंद व्यक्त केला आहे.



