हिवरा संगम येथे भव्य ‘विदर्भ हिंदकेसरी’ शंकर पट २८ फेब्रुवारी ते २ मार्च २०२६ दरम्यान आयोजन; महाराष्ट्रभरातून बैलजोड्यांचा सहभाग अपेक्षित

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील हिवरा संगम येथे २८ फेब्रुवारी ते २ मार्च २०२६ दरम्यान भव्य जंगी शंकर पटाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘विदर्भ हिंदकेसरी शंकर पट’ या नावाने प्रसिद्ध करण्यात आलेल्या या पारंपरिक स्पर्धेची जोरदार तयारी सुरू आहे.
भारत हा कृषीप्रधान देश असून शेतकरी आपल्या संस्कृतीचा कणा मानला जातो. शंकर पटसारखे पारंपरिक सोहळे हे केवळ स्पर्धा नसून शेतकरी आणि त्यांच्या बैलांमधील जिव्हाळ्याचे नाते जपणारा सांस्कृतिक उत्सव मानला जातो. ग्रामीण भागातील परंपरा, शौर्य आणि एकोपा यांचे दर्शन या शंकर पटातून घडते.
दरवर्षीप्रमाणे यंदाही हिवरा येथे मोठ्या उत्साहात शंकर पट भरविण्यात येणार असून आयोजनाची धुरा माजी जिल्हा परिषद सदस्य साहेबराव पाटील यांनी सांभाळली आहे. महाराष्ट्रातील विविध भागांतून बैलजोड्या या स्पर्धेत सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.
या शंकर पटासाठी आकर्षक आणि भव्य बक्षिसांची घोषणा करण्यात आली असून परिसरात पत्रके (पॅम्पलेट) वाटप करून मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी करण्यात आली आहे. त्यामुळे परिसरातील तसेच राज्यभरातील शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हिवरा संगम परिसरात या निमित्ताने उत्सवी वातावरण निर्माण झाले असून शेतकरी व ग्रामस्थांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.



