शहर

महागावात एफडीएची धडक कारवाई; ₹२६ हजार ६०० चा गुटखा जप्त सद्दाम शेख यांच्या घरावर छापा; गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ


महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव शहरात अनेक दिवसांनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) धडक कारवाई करत प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त केला. शहरातील सद्दाम शेख यांच्या राहत्या घरावर टाकलेल्या छाप्यात तब्बल २६ हजार ६०० रुपयांचा गुटखा आढळून आला. या कारवाईमुळे महागावसह परिसरातील गुटखा विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महागाव परिसरात प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व गुटख्याची विक्री होत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली होती. त्यानुसार अधिकाऱ्यांनी गुप्तपणे तपास करून सद्दाम शेख यांच्या घरावर छापा टाकला. या कारवाईदरम्यान विविध कंपन्यांच्या प्रतिबंधित गुटख्याचा साठा आढळून आला.
पथकाने पंचनामा करून २६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून संबंधितांविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे. वृत्त लिहिपर्यंत या प्रकरणातील अंतिम प्रशासकीय अथवा कायदेशीर कारवाईची माहिती उपलब्ध झाली नव्हती.
दरम्यान, दैनिक महासागरमध्ये १६ जून २०२६ रोजी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नियोजित धाडीची माहिती आधीच लीक झाल्याबाबत बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर आजची कारवाई विशेष चर्चेचा विषय ठरली. कारवाईची चाहूल लागताच महागाव शहरातील अनेक दुकाने बंद करण्यात आल्याचे तसेच काही दुकानदारांनी दुकाने सोडून पळ काढल्याचे चित्र पाहायला मिळाले.
असे असले तरी अन्न व औषध प्रशासन विभागाने गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडल्याचे सांगितले जात आहे. जप्त करण्यात आलेल्या गुटख्याप्रकरणी महागाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली असून परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.
महागाव तालुक्यात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री आणि भेसळयुक्त खाद्यपदार्थांविरोधात सातत्याने कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. एफडीएच्या या कारवाईमुळे अवैध गुटखा व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून प्रशासनाने यापुढेही अशाच धडक मोहिमा राबवाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button