पैनगंगा नदीत थरकाप उडवणारी हत्या!

- हातपाय बांधून गाठोड्यात फेकलेला अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला
उमरखेड :-
तालुक्यातील मुरली गावाजवळ सहस्रकुंड धबधब्याच्या शेजारी असलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याजवळ पैनगंगा नदीपात्रात एका अज्ञात इसमाची अत्यंत क्रूरपणे हत्या करून त्याचा मृतदेह हातपाय बांधून गाठोड्यात फेकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आज शुक्रवार (९ जानेवारी) रोजी सकाळी सुमारे १० वाजताच्या सुमारास हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सदर गाठोडे गुराख्याच्या निदर्शनास आल्यानंतर त्याने तात्काळ ही माहिती मुरली गावचे पोलीस पाटील विठ्ठल राठोड यांना दिली. त्यानंतर राठोड यांनी बिटरगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार पांडुरंग शिंदे यांना घटनेची माहिती कळवली. माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंतराव गायकवाड, ठाणेदार पांडुरंग शिंदे, बिट जमादार संतोष चव्हाण यांच्यासह पुसद येथील फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले.
फॉरेन्सिक पथकाने गाठोडे उघडून पाहणी केली असता सदर इसमाची अमानुषपणे हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. मृतकाच्या डोळ्यांवर, जबड्यावर तसेच शरीराच्या विविध भागांवर गंभीर जखमा आढळून आल्या. पायांवरही जबर मारहाण केल्याच्या खुणा दिसून आल्या असून चेहऱ्यावर प्लॅस्टिक पन्नी घट्ट बांधण्यात आलेली होती. प्राथमिक तपासात मृतकाच्या चेहऱ्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याचे तसेच जबडा फोडण्यात आल्याचे निदर्शनास आले. एवढेच नव्हे तर सतत मारहाण केल्यामुळे मृतकाचे दातही तुटल्याचे आढळून आले.
घटनास्थळावरच सोनदाभी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप हांडे यांनी फॉरेन्सिक पथकाच्या उपस्थितीत शवविच्छेदन केले. मृतदेह गाठोड्यात बांधून नदीपात्रात आढळून आल्याने ही हत्या अंदाजे आठ दिवसांपूर्वी करून मृतदेह पाण्यात फेकून दिल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान मृतकाची ओळख पटवण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंतराव गायकवाड यांनी तपासाची चक्रे फिरवत मराठवाड्यातील इस्लापूर, हिमायतनगर व हदगाव पोलीस ठाण्यांशी संपर्क साधून बेपत्ता व्यक्तींची माहिती घेतली. मात्र वृत्त लिहेपर्यंत मृतकाची ओळख पटू शकलेली नव्हती.
*कोट*
“अत्यंत क्रूरपणे हत्या करून अंदाजे आठ दिवसांपूर्वी मृतदेह नदीपात्रात फेकण्यात आला असावा. मृतक मराठवाडा भागातील असण्याची शक्यता आहे. त्याच्या अंगावर ‘दमदार खासदार नागेश पाटील आष्टीकर’ असा मजकूर असलेला टी-शर्ट व फुल पॅन्ट आढळून आली आहे. मात्र ओळख पटण्यासारखी कोणतीही वस्तू खिशात सापडलेली नाही,” अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंतराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार पांडुरंग शिंदे करीत आहेत.



