शासनाच्या निधीतून उभारलेली लाखोंची प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची इमारत करंजखेड येथे धूळखात

महागाव (प्रतिनिधी) संजय नागरगोजे
— महागाव तालुक्यातील करंजखेड येथे शासनाच्या निधीतून सुमारे ३० ते ३५ लाख रुपये खर्च करून प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची इमारत उभारण्यात आली. मात्र, ही इमारत आजही नागरिकांच्या उपयोगाविना बंद अवस्थेत धूळ खात पडलेली आहे.
प्राथमिक आरोग्य उपकेंद्र उभारण्यामागे ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्यविषयक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा उद्देश होता. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांचे व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष यामुळे हे उपकेंद्र अद्याप सुरू न झाल्याचे चित्र आहे.
लोकप्रतिनिधींनी याबाबत कोणतीही ठोस भूमिका न घेतल्याने तसेच आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपकेंद्र कार्यान्वित न केल्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असून शासनाच्या निधीचा अपव्यय होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
दरम्यान, अविनाश भांगे व संतोष भांगे यांनी तातडीने प्राथमिक आरोग्य उपकेंद्र सुरू करण्यात यावे, अशी जोरदार मागणी केली आहे. मात्र, या मागणीकडेही प्रशासन व लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
ग्रामीण नागरिकांच्या आरोग्य सुविधांसाठी शासनाने एवढा मोठा निधी खर्च करून इमारत उभी केली असताना, ती वापरात न आणता पडून राहणे हे अत्यंत गंभीर बाब असून जबाबदारी निश्चित करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष देऊन उपकेंद्र सुरू करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. आमदार किसनराव वानखडे याकडे लक्ष देतील का अशा प्रश्न नागरिकांनी केला आहे
—



