छतांची अवस्था धोकादायक; जिल्हा परिषद शाळांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष का? आमदार किसन वानखेडेंची वर्षानंतर शाळा पाहणी, मात्र महागाव तालुक्यातील विद्यार्थ्यांचा जीव अजूनही धोक्यात

महागाव/प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील इमारतींची अवस्था अत्यंत चिंताजनक असून छत कोसळण्याचा धोका असतानाही प्रशासन व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष सुरू आहे. अशा पार्श्वभूमीवर आमदार किसन वानखेडे यांनी ७ जानेवारी २०२६ रोजी जि. प. प्राथमिक मराठी शाळा, वरूणा तांडा, उटी येथे शैक्षणिक भेट दिली.
उंबरखेड नगरपालिकेची सत्ता गेल्यानंतर मतदार संघात तब्बल एक वर्षानंतर आमदारांनी ‘एकटा चलो’चा नारा देत दौरे सुरू केल्याची चर्चा आहे. मात्र या दौऱ्यांमुळे महागाव तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांच्या सुरक्षिततेचा प्रश्न मार्गी लागणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.
शाळा भेटीदरम्यान आमदार किसन वानखेडे यांनी विद्यार्थ्यांशी स्नेहपूर्ण संवाद साधत शिक्षणाचे महत्त्व, नियमित अध्ययन, स्वच्छता, शिस्त व नैतिक मूल्यांवर मार्गदर्शन केले. शाळा सुसज्ज असणे गरजेचे असून त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आपल्या शैक्षणिक अनुभवांची माहिती दिली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढल्याचे चित्र दिसून आले. मात्र शाळेच्या इमारतीची पाहणी करताना छत व बांधकामाबाबत गंभीर प्रश्न समोर आले.
यावेळी आमदारांनी लवकरच नवीन शाळा इमारतीसाठी निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. मात्र घोषणा होऊन अंमलबजावणी होत नसल्याचा अनुभव यापूर्वी अनेकदा आल्याने, विद्यार्थ्यांनी व ग्रामस्थांनी निधी तातडीने मंजूर करून काम सुरू करण्याची मागणी केली आहे.
महागाव तालुक्यातील बहुसंख्य विद्यार्थी गरिब कुटुंबातून येतात. जिल्हा परिषद मराठी शाळा हा त्यांच्यासाठी एकमेव शिक्षणाचा पर्याय आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांची तात्काळ पाहणी करून सुरक्षिततेची हमी देणे अत्यावश्यक असल्याचे मत नागरिकांतून व्यक्त होत आहे. अन्यथा एखादा मोठा अपघात झाल्यास जबाबदारी कोणाची, असा प्रश्न उपस्थित होत आहे.



