शिवसेना कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला प्रकरण उघड; ४ आरोपी जेरबंद, उमरखेड पोलिसांची धडाकेबाज कारवाई

उमरखेड प्रतिनिधी
उमरखेड शहरातील शिवसेना कार्यकर्ते रमेश गुलाबसिंह चव्हाण यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा अवघ्या ४८ तासांत छडा लावत उमरखेड पोलिसांनी चार आरोपींना जेरबंद करून उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली असून पोलिसांच्या तपास कौशल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दिनांक १६ जून २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७.४० वाजण्याच्या सुमारास रमेश चव्हाण हे दुचाकीवरून आपल्या घरी जात असताना सी.ओ. यांच्या शासकीय बंगल्याजवळ तीन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांना अडवले. आरोपींनी तोंडाला रूमाल बांधून लोखंडी रॉडने त्यांच्या पायावर प्रहार केला तसेच चाकूने गळ्यावर वार करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
या घटनेनंतर उमरखेड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५३७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०९(१), २९६, १२६(२) व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांनी विशेष पथके तयार करून तपासाच्या सूचना दिल्या. पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांच्या नेतृत्वाखाली डी.बी. पथक व पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावरील पुरावे, तांत्रिक माहिती आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
हल्लेखोरांनी तोंड झाकल्यामुळे त्यांची ओळख पटविणे मोठे आव्हान होते. मात्र, पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेत त्यांना तेलंगणा राज्यात फरार होण्यापूर्वी मध्यरात्री सापळा रचून अवधूतवाडी पोलीस स्टेशन हद्दीतून ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सय्यद आरीफ उर्फ धार सय्यद युसूफ (वय २७, रा. सचिननगर उमरखेड), अहेफाजोद्दीन उर्फ गौसोद्दीन मुज्जुमोददीन काझी (वय २६, रा. सुकळी ता. उमरखेड), दानीशोददीन अहेनुददीन काझी (वय १८, रा. तातरशहा वॉर्ड, उमरखेड) यांचा समावेश असून एक आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
तपासादरम्यान आरोपींनी हा हल्ला परवेझ उर्फ लाला सलीम खान यांच्या सांगण्यावरून केल्याची कबुली दिल्याचे समोर आले आहे. तसेच आरोपींना पळून जाण्यास मदत केल्याचाही आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही संपूर्ण कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक व्यंकट गंगलवाड, पोलीस उपनिरीक्षक गणेश मुंढे, डी.बी. प्रमुख शरद लोहकरे, सहाय्यक फौजदार मधुकर पवार तसेच उमरखेड पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
अवघ्या ४८ तासांत आरोपींना बेड्या ठोकून उमरखेड पोलिसांनी गुन्हेगारांना कायद्याचा धाक दाखवून दिल्याची चर्चा शहरात सुरू आहे.



