चातारी–कोपरा रस्त्याचे काम निकृष्ट; ठेकेदार–अधिकाऱ्यांच्या संगनमताचा आरोप

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
उमरखेड तालुक्यातील चातारी ते कोपरा रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. सदर रस्त्याच्या कामात गिट्टीवर रोल रोलर ने दबाई न करता , बारीक खडी व डांबर टाकून अत्यंत थातूरमातूर पद्धतीने काम केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.
रस्त्याच्या कामात रोलर ने न दाबता थेट डांबर टाकण्यात आल्याने काही दिवसांतच रस्ता जागोजागी उखडलेला दिसून येत आहे. त्यामुळे या कामात बांधकाम विभागाचे अधिकारी व संबंधित ठेकेदार यांच्यात संगनमत होऊन मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा संशय नागरिक व्यक्त करीत आहेत.
रस्ता पूर्ण होण्याआधीच त्याची अवस्था खराब झाल्याने चातारी परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला असून, दर्जेदार रस्ता करून द्यावा, अशी मागणी केली आहे. तसेच अशा बोगस व निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला तात्काळ ब्लॅकलिस्टमध्ये टाकावे, व कामाची स्वतंत्र चौकशी करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.
या डांबरीकरण रस्त्यावरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने अपघाताची शक्यता वाढली असून, संबंधित विभागाने तातडीने लक्ष देऊन दर्जेदार व टिकाऊ डांबरी रस्ता तयार करावा, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.



