सावित्री ज्योतीराव समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची ‘यवतमाळ कृषी महोत्सवास’ अभ्यास भेट

यवतमाळ प्रतिनिधी
यवतमाळ शहराच्या पिंपळगाव परिसरात दिनांक २७ ते ३१ मार्च २०२६ दरम्यान ‘यवतमाळ कृषी महोत्सवाचे’ आयोजन जिल्हा प्रशासनाच्या वतीने मोठ्या उत्साहात व दिमाखदारपणे करण्यात आले होते. स्थानिक सावित्री ज्योतिराव समाजकार्य महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागाअंतर्गत विद्यार्थ्यांनी यवतमाळ कृषी महोत्सवास अभ्यास भेट देऊन शेती क्षेत्र संदर्भातील नवनवीन तंत्रज्ञान जाणून घेतले. सोबतच पशुधन, पशु बाजारपेठ, शेळी पालन व्यवसाय, शेळी बाजारपेठ, कुकुट पालन या बाबी समजून घेत असतानाच उमेद प्रकल्पांतर्गत विविध स्वयंसहायता महिला बचत गटांना, गटाच्या स्टॉलला भेटी देऊन लघुउद्योजक महिलांच्या मुलाखती घेतल्या. मुलाखतीद्वारे स्वयंसहायता गटात ची रूपरेषा, लघुउद्योगाबाबतची संकल्पना, शासनाचे सहकार्य तथा योगदान व प्रोत्साहन, स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य, उत्पादन विक्री, आर्थिक उलाढाल याबाबी बारकाईने टिपल्या. महोत्सवादरम्यान उद्योजक महिलांची राहण्याची व्यवस्था, खानपान व प्रसाधन सुविधा आदी बाबींचा देखील लेखाजोखा समजून घेतला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी अनेक शेतकऱ्यांच्या देखील मुलाखती घेऊन शेतकऱ्यांची वाटचाल, शेतीची मशागत होणारा खर्च, उत्पादन, शेतमालाला मिळणारा भाव व शेती क्षेत्रातील आव्हाने या बाबीही जाणून घेतल्या.
कृषी अधिकारी, ग्रामविकास अधिकारी यांच्याशीही संवाद केला. सदरील अभ्यास भेटीच्या समन्वयक समाजशास्त्र विभाग प्रमुख व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सीमा शेटे-नवलाखे यांनी विद्यार्थ्यांना कृषी महोत्सव भेटीबाबतचे मार्गदर्शन केले. याप्रसंगी डॉ . शेटे यांनी उपस्थितांचे प्रबोधन करून प्रसिद्ध कवी अनंत भालेराव यांची

काट्याकुट्याचा तुडवीत रस्ता,
माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता
काळया बापाचं बापाचं हिरवं रान
काळया माईन, माईन पिकवल सोनं
त्याच्या घामाचा भाव लय सस्ता
माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता
या काव्य गीताला गाऊन ग्रामीण संस्कृती, कृषी संस्कृती बाबतचे सकारात्मक वातावरण निर्माण केले. भेटी दरम्यान प्रशासन अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले. सदर भेटीमध्ये समाजकार्य स्नातक भाग एक व दोनच्या विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग होता. दरम्यान विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तप्रिय व आत्मीयतेने जनसंवाद करून ग्रामीण आर्थिक जीवन, व कृषी क्षेत्र आणि शासनाच्या योजना जाणून घेण्याचा प्रयत्न केला. याप्रसंगी प्रणय अराठे या विद्यार्थ्यांनी आपल्या पपेट शोच्या माध्यमातून सामाजिक जनप्रबोधन व मनोरंजन केले. प्रस्तुत कृषी महोत्सवास भेट दिलेल्या विद्यार्थ्यांमध्ये समाजशास्त्रीय अनुषंगाने संशोधन वृत्ती व आनंददायी वातावरण निर्माण झाले.



