महागाव नगरपंचायतीत नगराध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव

महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष सुनंदा कोपरकर यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. नगरपंचायतीत विकासकामांपेक्षा राजकीय हालचालींना वेग आल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान, ४ फेब्रुवारी २०२६ रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी नगरपंचायतीतील कथित अनियमितता व भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी समिती नेमल्याचे समजते. या चौकशीला गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नगरपंचायत नोंदींमध्ये खोडतोड किंवा काही कागदपत्रे उपलब्ध नसल्याच्या चर्चाही सुरू असून याबाबत अधिकृत स्तरावर तपास सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. बहुमताच्या समीकरणांभोवती सुरू असलेल्या घडामोडींमुळे प्रशासनिक कामकाजावर परिणाम होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सर्व घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.



