Uncategorized

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या; काँग्रेसचे मुख्यमंत्र्यांना निवेदन


महागाव, प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यात २९ व ३० जुलै २०२६ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, बाधित शेतकऱ्यांच्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून शासनाच्या नियमानुसार आर्थिक मदत, नुकसानभरपाई व आवश्यक सवलती जाहीर कराव्यात, अशी मागणी महागाव तालुका काँग्रेस कमिटी, शहर काँग्रेस कमिटी व युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली.
या निवेदनाचे नेतृत्व महागाव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुनील राठोड तसेच शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व नगरसेवक शैलेश कोपरकर यांनी केले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मुसळधार पावसामुळे तालुक्यातील अनेक गावांमधील कापूस, सोयाबीन, तूर व इतर खरीप पिके पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. खरीप हंगामाबाबत मोठ्या अपेक्षा बाळगून पेरणी केलेल्या शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक संकट कोसळले आहे. त्यामुळे महसूल व कृषी विभागामार्फत तातडीने पंचनामे करून शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
शासनाने नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या परिस्थितीकडे संवेदनशीलतेने पाहून विलंब न करता मदत जाहीर करावी, अशी आग्रही मागणीही निवेदनातून करण्यात आली. तहसील कार्यालयात हे निवेदन सादर करण्यात आले असून, संबंधित मागण्या शासनाकडे पाठविण्याची प्रक्रिया करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, महेंद्र कांबळे, इमरान पठाण, नरवाडे, काँग्रेस नेते अतुल शिंदे, सुनील भवानकर, विठ्ठलराव पवार, चंदाताई रमेश भांगे, सुनिता चंद्रवंशी, जयश्री नरवाडे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला व विविध गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी शासनाने केवळ पंचनाम्यांची औपचारिकता न करता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने आर्थिक मदत जमा करावी, अन्यथा काँग्रेसच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला. संकटग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित न्याय देण्याची एकमुखी मागणीही यावेळी करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button