महागाव तहसीलमधूनच अवैध रेती वाहतूक ट्रक-ट्रॅक्टर “चोरी”; पोलिसांनी केली जप्ती – तहसीलदारांवर संगनमताचे आरोप

महागाव (प्रतिनिधी – संजय नागरगोजे)
महागाव तालुक्यातील फुलसावंगी परिसरात अवैध रेती वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असून, महसूल व तहसील प्रशासनाच्या निष्क्रियतेचा गंभीर मुद्दा समोर आला आहे. या प्रकरणात महागाव तहसील कार्यालयातूनच अवैध रेती वाहतूक करणारे ट्रक आणि ट्रॅक्टर चोरीला गेल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे.
दिनांक 4 जून 2025 रोजी खनिज अधिकाऱ्यांनी फुलसावंगी येथे ट्रक क्रमांक MH-04 EL-0489 हा तीन ब्रास रेतीसह पकडला. या वाहनावर 94,689 रुपयांचा दंड आकारण्यात आला आणि ट्रक तहसील कार्यालयात जप्त ठेवण्यात आला. यापूर्वीही या वाहनावर अवैध गौण खनिज वाहतुकीचा गुन्हा 3 जानेवारी 2025 रोजी नोंदवला गेला होता.
उपविभागीय अधिकारी उमरखेड यांनी या वाहनावर 6 लाख रुपयांचा दंड ठोठावला, मात्र स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार तहसीलदार व काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने तो ट्रक दंड न भरताच सोडण्यात आला.
यानंतर 30 ऑक्टोबर 2025 रोजी महसूल अधिकारी दीपक दिवेकर यांनी महागाव पोलिस स्टेशनला तक्रार दिली की तहसील आवारातून एक ट्रक आणि एक ट्रॅक्टर चोरीला गेले आहेत. या तक्रारीवरून महागाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 530/2025 नोंदवून ट्रॅक्टर मालक पंकज अशोक नरवाडे व ट्रक मालक सय्यद मुशब्बीर सय्यद जमीर (रा. डोंगरगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दोन्ही वाहने जप्त केली असली तरी आरोपींना अटक करण्यात आलेली नाही.
या घटनेमुळे महसूल विभागातील तहसीलदार व त्यांच्या सहकाऱ्यांचे रेती तस्करांशी संगनमत असल्याचे आरोप पुन्हा एकदा ठळक झाले आहेत. तहसील कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे असतानाही एवढी मोठी घटना लक्षात न येणे ही गंभीर बाब मानली जात आहे.
सामाजिक कार्यकर्त्यांसह नागरिकांनी महागाव तहसीलदार व संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हाधिकारी व महसूल विभागाकडे केली आहे



