उमरखेड येथे जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त कार्यक्रम; राष्ट्रीय ग्राहक दिनी मांडलेल्या प्रश्नांवरही चर्चा

सहसंपादक शेख मुजाहिद
उमरखेड : १५ मार्च रोजी साजरा होणाऱ्या जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त तहसील कार्यालय उमरखेड येथे १७ मार्च रोजी ग्राहक दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. १५ मार्च हा रविवार आल्यामुळे कार्यक्रम मंगळवारी घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे तालुका अध्यक्ष प्रा. प्रकाश देशमुख होते.
यावेळी व्यासपीठावर तहसीलदार राजेश सुरडकर, ग्राहक पंचायतचे कार्याध्यक्ष ॲड. विलासराव देवसरकर, उपाध्यक्ष दत्ता गंगासागर, सचिव रतिराज बोरगडे, कोषाध्यक्ष यशवंत गिरी उपस्थित होते.
प्रास्ताविकात ॲड. विलासराव देवसरकर यांनी ग्राहक दिन साजरा करण्यामागील उद्दिष्ट स्पष्ट करताना सांगितले की, ग्राहक चळवळ प्रभावी व्हायची असेल तर नागरिक सजग असणे अत्यावश्यक आहे. मात्र नागरिक सजग व जागरूक नसल्यामुळे आज नागरिकांची प्रत्येक ठिकाणी पिळवणूक होताना दिसते त्याचबरोबर प्रशासकीय यंत्रणेकडूनही नागरिकांच्या समस्या वेळेत सोडवल्या जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

तहसीलदार राजेश सुरडकर यांनी आपल्या भाषणात ग्राहक दिन केवळ औपचारिकतेपुरता मर्यादित न ठेवता नागरिकांच्या तक्रारी प्राधान्याने सोडवण्यावर भर दिला. तसेच दर महिन्याला होणाऱ्या लोकशाही दिनात ग्राहक पंचायत कार्यकारिणीचा समावेश करून सातत्याने नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्याची सूचना त्यांनी केली.
अध्यक्षीय भाषणात प्रा. प्रकाश देशमुख यांनी ग्राहक संरक्षण कायदा २०१९ लागू होऊनही नागरिकांची पिळवणूक सुरूच असल्याची टीका केली. तसेच २४ डिसेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्ताने नागरिकांनी मांडलेल्या समस्यांवर अद्याप तोडगा न निघाल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. अनेक प्रशासकीय कार्यालयांच्या प्रतिनिधींच्या अनुपस्थितीवरही त्यांनी संताप व्यक्त करत अनुपस्थित कार्यालय प्रमुखांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याची मागणी केली. तसेच तसा अहवाल जिल्हाधिकारी यांना पाठविण्याची सूचना केली
कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून विविध समस्या मांडल्या. यामध्ये गॅस पुरवठा, पेट्रोल-डिझेल दर, पेट्रोल पंपावरील आवश्यक नागरि सुविधा, अपूर्ण रस्त्याचे कामे, पावसाळ्यात निर्माण होणारी गंभीर परिस्थिती, वीज व पाणीपुरवठा, नगरपालिका कर, दूषित पाणी, वाहतूक कोंडी, विद्यार्थ्यांची बस सुविधा तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणी अशा विविध प्रश्नांचा समावेश होता.

यावेळी आगार प्रमुख कार्यालयाचे प्रतिनिधी, तालुका कृषी अधिकारी, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता, वजनमापे विभाग, एपीएमसी, भारत पेट्रोलियम, खरेदी-विक्री संघ, पुरवठा विभाग, तहसील कार्यालय, सेतू कार्यालय आदी विभागांचे प्रतिनिधी तसेच ग्राहक पंचायतचे पदाधिकारी व सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मांडण्यात आलेल्या समस्यांवर तातडीने कार्यवाही करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन संदीप गाडगे यांनी केले तर अहवाल लेखन अमोल महाजन पुरवठा अधिकारी यांनी केले हा कार्यक्रम उमरखेड तहसीलदार व तहसील कार्यालयाच्या वतीने घेण्यात आला



