उन्हाळ्यात शहरवासीयांना पाणीटंचाई भासणार नाही याची काळजी घेऊ नवनिर्वाचित नगराध्यक्ष शेख रफिक शेख मेहबूब

हिमायतनगरला पाणीटंचाई निवारणासाठी नियोजन सुरू; वॉर्ड क्र. ४ मध्ये बोअरवेलचे काम प्रगतीपथावर
हिमायतनगर ( ता प्रतिनिधी शेख खयुम खूरेशी):
उन्हाळ्यापूर्वी शहरातील नागरिकांना पाणीटंचाई भासणार नाही, यासाठी प्रत्येक वॉर्डावर लक्ष देऊन नवीन बोअरवेल घेण्याचे काम नगरपंचायत प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू आहे. जनतेला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करणे ही आमची जबाबदारी असून, यावर्षी शहरवासीयांना पाण्याची कमतरता भासू देणार नाही, असा विश्वास नगराध्यक्ष रफिकभाई शेख यांनी व्यक्त केला आहे.

सोमवारी शहरातील वॉर्ड क्रमांक ४, मुर्तुजानगर भागात नगराध्यक्षांच्या हस्ते बोअरवेल घेण्याच्या कामाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी त्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. शहरात नगरपंचायतीचा कारभार हाती घेताच स्वच्छता आणि पाणीपुरवठा या विषयांना प्राधान्य दिले असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्य रस्त्यावरील कचरा आणि सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता राखण्यासाठी कर्मचाऱ्यांना कडक सूचना देण्यात आल्या आहेत.
नगराध्यक्ष पुढे म्हणाले की, माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या नेतृत्वाखाली शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. उपनगराध्यक्ष विनोद गुंडेवार आणि सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन पाणीटंचाई निवारणाचे चोख नियोजन करण्यात येत आहे. याप्रसंगी योगेश चिलकावार, सुमित कांगणे, बाळू मेंडके, हानिफ़ सर यूनुस मिस्त्री यांच्यासह वॉर्डातील युवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



