नॅचरल शुगरचा सीएनजी गॅस निर्मिती प्रकल्प तालुक्याला वरदान ठरणार !

“महागाव,पुसद तालुक्यातील सहकारातील तथाकथित राजकारण्यांना जोरदार चपराक”
महागाव तालुक्याची वाटचाल उद्योगाकडे
नॅचरल शुगरच्या विकासात समूहाचे अध्यक्ष कृषीरत्न बि. बि. ठोंबरे यांचा महत्त्वाचा वाटा
महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी नॅचरल शुगर युनिट दोनच्या सीएनजी गॅस निर्मिती प्रकल्पाचे नुकतेच भूमिपूजन समूहाचे अध्यक्ष कृषिरत्न बी. बी. ठोंबरे यांच्या हस्ते सवना गुंज साईटवर 3 जुलै रोजी गुरुवारला संपन्न झाले.नऊ वर्षांपूर्वी पूर्वाश्रमीचा पुष्पवंती सहकारी साखर कारखाना नॅचरल शुगर समूहाने खरेदी करून पुसद, महागाव आणि उमरखेड विभागातील ऊस उत्पादकांना विदर्भातील सर्वाधिक भाव देणारा कारखाना म्हणून नॅचरल शुगर युनिट नंबर 2 ने विकास कामात मोठा नावलौकिक मिळवला. महागाव, पुसद तालुक्यातील कथीत सहकारातील घरभेदी राजकारण्यांनी भ्रष्टाचार करून डबघाईस आणलेला सहकारी कारखाना नॅचरल समूहाचे अध्यक्ष यांच्या कल्पक बुद्धीमुळे आज रोजी विदर्भातील ऊसाला सर्वाधिक भाव देणारा कारखाना ठरला आहे. महागाव,पुसद तालुक्यातील एकाही सहकारातील दळभद्री राजकारण्यांना हे जमले नाही. स्वतः आणि स्वतःचेच पोट भरण्याची वृत्ती असल्यामुळे विभागातील भ्रष्ट राजकारण्यांनी सहकार क्षेत्रातील उद्योगांची वाट लावली आहे. वसंत सहकारी साखर कारखाना आणि पूर्वाश्रमीचा पुष्पावंती सहकारी कारखाना बंद पाडण्याचे पातक या भ्रष्ट राजकारण्यांनी केली आहे.भ्रष्ट राजकारण्यांना जोरदार चपराक बसवत भारतातील चौथा आणि विदर्भातील पहिला सीएनजी गॅस निर्मिती करणारा नॅचरल शुगर युनिट 2 कारखाना गॅस निर्मिती प्लांट समूहाचे अध्यक्ष बी.बी. ठोंबरे यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे साकारत आहे.नॅचरल शुगर युनीट नंबर 1 रांजनी येथे सीएनजी 5 टनी प्लांट पूर्ण क्षमतेने चालू आहे. कामगार आणि सुशिक्षित तरुणांच्या हाताला काम मिळून देत, शेतकऱ्यांनाही मोठा आर्थिक फायदा होण्यास मदत झाली आहे. सीएनजी गॅस निर्मिती उसाची ऊस मळी ( प्रेसमड ) आणि नेपियर गवताच्या कांड्या पासून मोठ्या प्रमाणावर गॅस निर्मिती होत असल्यामुळे नेपीयर गवताची शेतकऱ्यांनी लागवड केल्यास मोठ्या प्रमाणावर आर्थिक फायदा होणार आहे.नेपियर गवत लागवडी पासून तीन महिन्यात कटाईला येते. त्यामुळे त्याच्या वर्षातून चार तोडण्या होतात. सीएनजी गॅस निर्मिती कारखाना बाराही महिने सतत चालू राहत असल्यामुळे चारही तोडण्या गॅस निर्मिती कारखान्याला जाऊन बारा महिन्यात जवळपास दीड लाखाचे उत्पन्न शेतकऱ्यांना एकरी मिळणार आहे. गॅस उत्पादनास सुरुवात झाल्यावर महागाव, पुसद भागामध्ये सहा ते सात सीएनजी गॅस पंप कार्यान्वित होऊन रोडवर शेती असणाऱ्या गरजू शेतकऱ्यांना सीएनजी गॅसची डीलरशिप मिळून उत्पन्नात वाढ होण्यासाठी मदत होणार आहे.नॅचरल शुगर युनिट नं. 2 च्या सवना- गुंज साईटवर समूहाचे अध्यक्ष कृषिरत्न बि.बि. ठोंबरे
यांच्या शुभहस्ते सीएनजी गॅस निर्मिती कारखान्याच्या जागेचे भूमिपूजन होऊन जुलै ते ऑक्टोंबर जवळपास चार महिन्यात सीएनजी गॅस निर्मिती प्लांट तयार होणार आहे. उसाच्या कारखान्यासोबतच गॅस निर्मिती कारखाना चालू करण्याचा मानस बी. बी. ठोंबरे यांनी बोलून दाखविला. भारतातील चौथा आणि विदर्भातील पहिला सीएनजी गॅस निर्मिती कारखाना ठोंबरे यांच्या कल्पक बुद्धीमुळे सवना- गुंज येथे होत असल्यामुळे भविष्यात पेट्रोल डिझेलला पर्याय म्हणून सीएनजी गॅस निर्मिती महागाव तालुक्यात होत असल्यामुळे महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. जवळपास 20 कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या ह्या प्रकल्पात ऊस पिकाच्या तुलनेत नेपियर गवतास लागण खर्च खूपच कमी येत असून उत्पादन बरोबरीने असल्याने ऊस पिकास पर्यायी पीक म्हणून बघितले जाणार आहे. हा प्रकल्प 12 महिने सुरू राहणार असल्याने रोजगाराच्या संधी सुद्धा निर्माण होणार आहेत. महागाव कार्यक्षेत्रात सीएनजी गॅसचे पेट्रोल पंप निर्माण होणार आहे. सध्या या गवताची किंमत प्रति टन 1000 रुपये दराने खरेदी युनिट 1 ला करण्यात येत असल्याचे या वेळी ठोंबरे यांनी सांगितले. त्यामुळे त्याचीच प्रतिकृती या परिसरात होत असल्याने शेतकऱ्याला याचा पुढील काळात निश्चितच आर्थिक दृष्ट्या फायदा होणार आहे. या परिसरात नव्याने सीएनजी प्रकल्पाची सुरुवात केल्याने कृषिरत्न ठोंबरे यांचे आणि नॅचरल सुगर समूहाचे परिसरात कौतुक होत आहे.



