नाली तुंबली, दुर्गंधीने नागरिक हैराण; दोन महिन्यांपासून तक्रारीकडे दुर्लक्ष!

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
हिवरा (संगम) येथील प्रभाग क्र. ३ मधील प्रकार; ग्रामसेवकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, गटविकास अधिकाऱ्यांकडे नागरिकाची धाव
महागाव :हिवरा (संगम) येथील प्रभाग क्रमांक ३ अर्थात भीमनगर परिसरात नाली तुंबल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याची तक्रार समोर आली आहे. नालीचे तोंड बंद असल्याने सांडपाणी साचून परिसरात दुर्गंधी व घाण पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.या गंभीर समस्येकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.
याबाबत भिकु दत्ता हनवते, रा. हिवरा (सं.) व इतर नागरिकांनी पंचायत समिती महागावचे गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदन सादर केले आहे. निवेदनावर १६ सप्टेंबर २०२६ रोजी प्राप्तीची नोंद असल्याचे दिसून येते.

निवेदनानुसार, मिलिंद भिमराव कदम यांच्या घरापासून अनंतवाडी रोडकडे जाणाऱ्या नालीत कचरा व घाण तुंबल्यामुळे बंद झाली आहे. त्यामुळे नालीतील पाणी साचून दुर्गंधी आणि घाण निर्माण होत आहे. नालीचे तोंड मोकळे करून पाण्याचा योग्य निचरा करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, तक्रार करूनही जवळपास दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
“आता माझ्याकडे वेळ नाही” असे सांगितल्याचा आरोप
तक्रारदाराने निवेदनात ग्रामसेवक ठाकरे यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केल्याचे म्हटले आहे. मात्र, ग्रामसेवकांनी गावात अनेक कामे असल्याचे सांगत तातडीने काम करण्यास असमर्थता दर्शवल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, संबंधितांकडे लेखी तक्रार मागितल्यानंतर ती तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर करण्याची तयारी दर्शवण्यात आली; मात्र त्यानंतरही प्रत्यक्ष नाली साफ करण्याची कार्यवाही झालेली नसल्याचा दावा करण्यात आला आहे. “अर्ज कोणाकडे करायचा आहे करा, कोणाकडे जायचे आहे तिथे जा,”अशा स्वरूपाचे उत्तर मिळाल्याचाही आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
ग्रामपंचायतीच्या कारभारावर नागरिकांचा संताप
एका साध्या नालीच्या समस्येसाठी नागरिकांना दोन-दोन महिने कार्यालयीन फेऱ्या माराव्या लागत असतील, तर ग्रामपंचायतीचा कारभार नेमका कोणासाठी आहे, असा सवाल आता उपस्थित होत आहे. नालीतील सांडपाणी आणि घाणीमुळे दुर्गंधी पसरत असताना संबंधित यंत्रणा एखाद्या गंभीर आजाराची किंवा मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे का?असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित होण्याची शक्यता आहे.
तक्रारीची प्रत पंचायत समिती महागावकडे सादर करण्यात आली असून, ग्रामपंचायत हिवरा (सं.) कडे केलेल्या अर्जाची झेरॉक्सही जोडल्याचे निवेदनात नमूद आहे.
नाली साफ करण्यासारख्या मूलभूत नागरी सुविधेच्या प्रश्नावरही जर नागरिकांना वारंवार तक्रारी कराव्या लागत असतील, तर संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांची उत्तरदायित्व निश्चित होणे गरजेचे आहे. या प्रकरणाची चौकशी करून नाली तातडीने साफ करावी, सांडपाण्याचा योग्य निचरा करावा आणि नागरिकांना होत असलेल्या त्रासातून मुक्तता मिळवून द्यावी, अशी मागणी होत आहे.
गटविकास अधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे लक्ष!
आता पंचायत समिती महागावचे गटविकास अधिकारी या तक्रारीची किती गांभीर्याने दखल घेतात आणि संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाला कोणते निर्देश देतात, याकडे हिवरा (संगम) ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802



